सातारा येथील जन्मगावी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक उभारण्यात येणार !

संग्रहित छायाचित्र

मुंबई – २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर पाकच्या अतिरेक्यांनी केलेल्या आक्रमणात हुतात्मा झालेले अशोकचक्र सन्मानित तुकाराम ओंबळे यांचे त्यांच्या जन्मगावी स्मारक उभारले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मौजे केडंबे हे त्यांचे जन्मगाव आहे. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमामुळेच पाकपुरस्कृत अतिरेक्यांपैकी एकमात्र कसाब याला जिवंत पकडता आले.

हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक उभारण्यासाठी सातारा जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली राज्यशासनाने ३० नोव्हेंबर या दिवशी समिती स्थापन केली आहे.

तुकाराम ओंबळे यांचा वीरश्री जागृत करणारा पराक्रम !

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गोळीबार करून अतिरेकी गिरगाव चौपाटीकडे भरधाव वेगाने निघून गेले. गिरगाव चौपाटी येथे मार्गावर बॅरिकेट्स लावून पोलिसांनी टॅक्सी अडवली. या वेळी टॅक्सीतून बाहेर येऊन अतिरेकी कसाब याने पोलिसांवर गोळ्यांचा मारा केला. त्याला न जुमानता पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे यांनी कसाबच्या दिशेने धाव घेतली. शरिरावर अनेक गोळ्या झेलूनही त्यांनी धावत जाऊन कसाबला जिवंत पकडले. शरीरातून रक्त्याच्या धारा वहात असूनही त्यांनी कसाबला सोडले नाही. त्यांच्या या पराक्रमामुळे पाकपुरस्कृत अतिरेक्यांपैकी एकमात्र कसाब याला जिवंत पकडता आले, तसेच त्यामुळे काँग्रेसने निर्माण केलेला तथाकथित हिंदु आतंकवादाचा बुरखा फाटला गेला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचा पराक्रम आजही सर्व पोलीस आणि भारतीय यांमध्ये वीरश्री निर्माण करतो.