Uttarakhand Rescue A Miracle ! : कामगार सुखरूप बाहेर येणे, हा चमत्कार असल्याने मला तेथील मंदिरात जाऊन आभार मानावे लागतील !

ऑस्ट्रेलियाहून बोलावण्यात आलेले तज्ञ अर्नाल्ड डिक्स यांचे विधान !

कामगारांची सुखरूप सुटका होणे, हा एक चमत्कारच आहे. जे काही घडले त्याचे आभार मानण्याचे मी वचन दिले आहे – अर्नाल्ड डिक्स यांचे विधान !

उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील सिल्कियारा बोगद्यातून १७ दिवसानंतर ४१ कामगारांची सुखरूप सुटका झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाहून बोलावण्यात आलेले बोगद्याच्या कामातले तज्ञ अर्नाल्ड डिक्स यांचे कौतुक केले जात आहे. या कामात त्यांचे योगदानही मोठे आहे. कामगारांच्या सुटकेनंतर प्रसारमादध्यमांशी बोलतांना डिक्स म्हणाले, ‘‘मला बोगद्याच्या बाहेर असलेल्या मंदिरात जाऊन आभार मानावे लागतील. कामगारांची सुखरूप सुटका होणे, हा एक चमत्कारच आहे. जे काही घडले त्याचे आभार मानण्याचे मी वचन दिले आहे.’’ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिज यांनी डिक्स यांचे कौतुक करत त्यांना त्यांच्या कामासाठी ‘धन्यवाद’ म्हटले आहे.

(सौजन्य : Republic World) 

डिक्स पुढे म्हणाले, ‘‘तुम्हाला आठवत आहे का ?, मी तुम्हाला म्हटले होते की, हे कामगार नाताळपर्यंत बाहेर येतील. कुणालाही कसलीही दुखापत होणार नाही. नाताळ जवळ येत आहे. आम्ही बचावाचे काम करतांना शांत होतो. ‘पुढची वाटचाल कशा पद्धतीने करायची ?’, याविषयी आम्ही स्पष्ट होतो. एक पथक म्हणून आम्ही उत्तम काम केले. भारतात जगातले उत्कृष्ट अभियंते आहेत. या यशस्वी मोहिमेचा मी एक भाग होतो, याचा मला आनंद आहे.’’

डिक्स मंदिरात प्रतिदिन करत होते प्रार्थना !

अर्नाल्ड डिक्स ज्या दिवशी बोगद्याजवळ कामासाठी पोचले, त्यादिवशी त्यांनी येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बाबा बौख नाग मंदिराचे गुडघ्यावर बसून दर्शन घेऊन प्रार्थना करून कामाला प्रारंभ केला होता. तेव्हापासून ते प्रतिदिन मंदिरासमोर प्रार्थना करत होते. याविषयी ते म्हणाले की, मी माझ्यासाठी काही मागितले नाही, तर ४१ कामगार आणि त्यांच्या सुटकेसाठी साहाय्य करणार्‍यांसाठी मी प्रार्थना करत होतो.

संपादकीय भूमिका

  • भारतातील किती तज्ञ असा भाव ठेवतात ?