तमिळनाडूतील हिंदू आणि हिंदी विरोध : एक दृष्टीक्षेप !

तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्याप्रकारे विखारी आणि द्वेषपूर्ण भाषण करून सनातन धर्म संपवण्याची भाषा केली होती, तमिळनाडू ही द्रविडभूमी म्हणून फुशारक्या मारल्या होत्या, खरेतर ती भूमी अनेक सुप्रसिद्ध मंदिरांची भूमी आहे. असे असले तरी त्यांच्यासारख्या राजकारण्यांमुळे या भूमीवर वास्तव्य करणार्‍या काही लोकांचीही मानसिकता फुटीरतावादी होत चालली आहे, याचा प्रत्यय मला तमिळनाडू येथे फिरतांना आला, तर काही लोकांची मात्र देशहितैषी मानसिकता लक्षात आली. – श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद

१. हिंदी-हिंदु विरोधाचे मूळ – पेरियार !

पेरियार

ई.व्ही. रामासामी नायकर यांनाच काही तमिळ लोकांनी पेरियार (म्हणजे सन्माननीय व्यक्ती) अशी उपाधी दिली. वर्ष १८७९ मध्ये तमिळनाडूतील इरोड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरात धार्मिक वातावरण असले, तरी ते बुद्धीप्रामाण्यवादी होते. ते हिंदु धर्मग्रंथ, प्रवचने यांतील सतत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, परस्परविरोधी गोष्टी आढळल्या, तर त्यांची खिल्ली उडवत. त्यांनी हिंदु धर्मग्रंथ जाळले. तथाकथित ब्राह्मणवादाला विरोध केला. रावणाला नायक मानले. असे म्हणतात की, ते वडिलांशी वाद झाल्याने घर सोडून काशीयात्रेला गेले, तेथे त्यांना जातीव्यवस्थेचा सामना करावा लागण्याचा प्रसंग घडला आणि नंतर ते पूर्णपणे नास्तिक बनले. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून चालू झाला, नंतर ‘जस्टिस पार्टी’चे अध्यक्ष बनले. याच पक्षाचे नाव नंतर ‘द्रविड कळघम्’ करण्यात आले. त्यांची पहिली पत्नी वारल्यावर त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने ४० वर्षांहून लहान मुलीशी विवाह केला. त्यावरून आणि अन्य काही कारणाने द्रविड कळघम् पक्षाच्या पदाधिकार्‍यांसमवेत त्यांचा वाद झाला आणि द्रविड कळघम्चे विभाजन होऊन दोन पक्ष झाले. पेरियार यांनी आयुष्यभर स्वत: हिंदु धर्माचा द्वेष केला आणि स्वत:च्या अनुयायांनाही तसे शिकवले. त्यांच्याविषयी असे सांगितले जाते की, हिंदु देवतांच्या मूर्ती पेरियार हातगाडीवरून मुख्य बाजारात आणायचे आणि हातोड्याने मूर्ती तोडत देवतांवर टीका करायचे.

श्री. यज्ञेश सावंत

२. हिंदीला विरोध

वर्ष १९३७ मध्ये सी. राजगोपालचारी तत्कालीन ‘मद्रास प्रेसिडेन्सी’चे मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांनी शाळेत हिंदी भाषेचे शिक्षण अनिवार्य केले. याला पेरियार यांनी कडाडून विरोध केला. तीव्र आंदोलनांना त्यांनी प्रोत्साहन दिले. ‘हिंदी भाषा लागू झाल्यास तमिळ संस्कृती नष्ट होईल, तमिळ उत्तर भारतियांच्या अधीन होतील’, असे ते मानत. हिंदु म्हणजेच आर्य आणि द्रविड वेगळे आहेत, द्रविड हे स्थानिक तमिळच आहेत, हे विष तमिळ जनतेच्या मनात पेरियार यांनीच भिनवले आहे.

त्यांनी हिंदु धर्मविरोधी पुस्तके लिहिली आहेत. द्रविड या नावावरून तमिळनाडूत दोन पक्ष आहेत. त्यातील एक म्हणजे डी.एम्.के. आणि दुसरा ए.आय.ए.डी.एम्.के. दोन्ही पक्ष भाजपविरोधी असले, तरी जयललिता यांचा ए.आय.ए.डी.एम्.के. पक्ष भाजपची बाजू घेत होता.

३. मंदिरांची भूमी असलेले तमिळनाडू राज्य !

तमिळनाडूत प्राचीन अशी ३३ सहस्र हिंदु मंदिरे आहेत, त्यापैकी काही मंदिरे ३ सहस्र वर्षांपेक्षाही प्राचीन आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या ३ लाख ९० सहस्र ६१५ मंदिरे आहेत. त्यामध्ये सुप्रसिद्ध रामेश्वरम् शिवलिंग मंदिर, जगप्रसिद्ध मदुराई येथील मीनाक्षी मंदिर, वेल्लोर येथील श्री लक्ष्मीनारायणाचे सुवर्ण मंदिर, पुष्कळ मोठे असलेले श्री रंगनाथस्वामी मंदिर, कन्याकुमारी मंदिर, महाबलीपूरम् येथील मंदिरे इत्यादी. कुंभकोणम्ला मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते, तर कांचीपूरम् येथे पुष्कळ आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. तमिळनाडूत जवळपास प्रत्येक देवतेचे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. अधिकांश मंदिरे शिवाशी संबंधित असली, तरी भगवान विष्णु, कार्तिक स्वामी, गणपति, मारुति यांचीही मंदिरे येथे आहेत. भारतात सर्वाधिक हिंदु मंदिरे असलेले राज्य तेथील हिंदुद्वेषी शासनकर्त्यांनी द्रविडस्थान, द्रवीडभूमी म्हणून गणना करणे हा केवळ विरोधाभास असून तो हिंदु आणि हिंदी विरोधाचाच परिणाम आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

४. हिंदु मंदिरांचे सरकारीकरण

तमिळनाडूतील रामेश्वरम् सारख्या तीर्थक्षेत्रातील छोट्यातील छोट्या मंदिरातही मला अनेक दानपेटया त्यावर काही क्रमांक लिहिलेल्या दिसल्या. याविषयी चौकशी केल्यावर या दानपेट्या सरकारी आहेत. म्हणजेच येथे भक्त अर्पण करत असलेला पैसा थेट सरकारी तिजोरीत जमा करण्याची व्यवस्था आहे. येथील ३६ सहस्र ४२५ मंदिरे, ५६ मठ, १८९ न्यास, १ सहस्र ७२१ धार्मिक मालमत्ता सरकारच्या कह्यात आहेत. मंदिरांची सहस्रो एकर भूमी सरकारच्या कह्यात आहे. म्हणजे एका बाजूला सनातन हिंदु धर्माला विरोध करायचा, तथाकथित द्रविड संस्कृतीचा पुरस्कार करायचा आणि पैसा हिंदु मंदिरांचा लुटायचा असा दुटप्पीपणा तमिळनाडू येथे चालू आहे. मंदिरांकडून सरकारला पुष्कळ उत्पन्न आहे. तरीही ही मंदिरे ज्या हिंदु धर्माची आधारशीला आहे, त्या धर्मालाच येथे विरोध आहे, हे आश्चर्य आहे. तसेच कुणीही त्याविरुद्ध आवाज उठवत नाही, हे त्याहून महाआश्चर्य आहे. सुचिंद्रम् सारख्या मारुति मंदिरात तर पुजार्‍यांना येणार्‍या भक्तांना देवतेला लोणी अर्पण करण्यासाठी ते विकण्याचा व्यवसाय करावा लागतो; कारण त्यांच्या दृष्टीने मंदिरात भक्त अर्पण करतात, ते सर्व सरकारी तिजोरीत जमा होते. तमिळनाडूतील काही प्राचीन मंदिरात पुजार्‍याला केवळ ७५० रुपये प्रतिमास एवढे तुटपुंजे वेतन मिळते. याविषयी न्यायालयात संबंधित पुजार्‍याने खटला प्रविष्ट केल्यावर ही धक्कादायक माहिती मिळाली. पुजार्‍याचे किमान वेतन १० ते १२ सहस्र रुपये प्रतिमास करण्याची मागणी आहे.

५. हिंदी विरोधाचे परिणाम

चेन्नई येथे रेल्वेस्थानकाच्या नावात चेन्नई असलेली ५ हून अधिक स्थानके आहेत. मला तेथील एका स्थानकावरून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी एका व्यक्तीला हिंदीमध्ये मी विचारले, तर तो एवढा चिडला. ‘तुम्ही शिक्षित आहात, तर तुम्हाला समजले पाहिजे’, वगैरे बोलू लागला. त्यामुळे इंग्रजीत विचारावे लागत होते. चेन्नईतील हिंदीची अडचण लक्षात आली. एका उपाहारगृहात जेवणासाठी विचारणा केली, तेव्हा तेथील नोकराला इंग्रजीत विचारले, तेव्हा त्याला काही भाग कळला, काही कळला नाही. त्यामुळे त्याने काही पदार्थ आणून दिले, पुढील भाग कळला नाही, तेव्हा त्याने मालकाला बोलावले, तर लक्षात आले की, मालकाला इंग्रजी तर काहीच कळत नाही. परिणामी भिंतीवरील पदार्थ दाखवून ‘हा हवा आहे’, असे सांगावे लागले.

कन्याकुमारी येथील आतील काही भागांमध्ये गेल्यावर तेथे हिंदी तर नाहीच, इंग्रजीही लोकांना येत नाही, परिणामी लोकांशी व्यवहार करण्यात पुष्कळच अडचणी येतात हे लक्षात आले. परिणामी तेथील उपाहारगृहात जेवण आणि अल्पहार मागवतांना पुष्कळच समस्या येतात. हिंदीत बोललो तर लोक तुम्हाला परकीय प्रदेशातून आले आहेत, असे पहातात.

६. सोयीस्कररित्या भाषाभिमान

रामेश्वरम् येथील प्रवासात भेटलेल्या तमिळ भाषिकांनी सांगितले की, तमिळ माणूस जेव्हा दुबई आणि अन्य आखाती देशात जातो, तेव्हा मात्र हिंदीत कसे काय बोलतो ? भारतातच बोलत नाही. रामेश्वरम्, कन्याकुमारी अशा मोठ्या तीर्थक्षेत्रांतील तमिळ लोक हिंदी बोलतात; कारण त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असल्याने त्यांना आलेल्या पर्यटकांच्या समवेत हिंदीत बोलावेच लागते. तमिळ भाषिकांनी सांगितले की, आम्हाला केंद्र सरकारच्या योजनेनुसार विनामूल्य हिंदी शिकता येईल; मात्र येथील शासनकर्ते विशेषत: स्टॅलिन हे पैसे भरून इंग्रजी शिकण्यासाठी आमच्यावर दबाव आणतात.

तमिळनाडूतील चर्चप्रणीत एका मोठ्या शिक्षणसंस्थेचे ख्रिस्ती व्यवस्थापक माझ्यासमवेत मदुराई ते रेनुगुंठ्ठा प्रवासात होते. त्यांनी हिंदीविषयी सांगितले की, हिंदी भाषा शिकणे आम्ही चर्चमधील शाळांसाठी लागू केले आहे. माझी दोन्ही मुले हिंदी शिकून हिंदीत बोलतात; मात्र राजकारणी लोकच अडवणूक करतात. आमच्यासारख्या सुजाण लोकांकडून हिंदीची मागणी होतेच आहे; मात्र हिंदीद्रोही शासन विरोध करते आहे.

७. शासनकर्त्यांची फुटीरतावादी मानसिकता लोकांमध्येही !

कन्याकुमारी येथे भेटलेल्या आंध्रप्रदेश येथील लोकांनी सांगितले की, बहुतांश तमिळ लोकांमध्ये वर्चस्ववादी मानसिकता असल्यामुळे अन्य ४ भाषिकांपासून (मल्याळम्, कन्नड, तेलुगु, तुळु) ते स्वत:ला वेगळे समजतात, असे त्यांच्या शेजारील राज्यांना वाटते. ‘तमिळ सुप्रिमसी’चा (तमिळला सर्व भाषांमध्ये श्रेष्ठ मानणे) प्रचार अधिक केला असल्यामुळे जनतेला तमिळ भाषा, संस्कृती सर्वांत पुरातन वाटते. काही मासांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एक निर्णय देतांना सांगितले की, केवळ संस्कृत ही देवतांची भाषा नसून तमिळ हीसुद्धा आहे. त्यामुळे देशभरातील मंदिरांमध्ये तमिळ भाषेतील स्तोत्रे म्हटली पाहिजेत.

तमिळ लोक द्रविडीयन चळवळीमुळे स्वतःला श्रेष्ठ मानतात. त्यामुळे अन्य राज्ये केरळ, आंध्रप्रदेश यांपासून वेगळे समजायला लागले. या द्रविडभूमीच्या आग्रहामुळे ते वेगळे झाले. भाषा वर्चस्वाविषयी अथवा वादाविषयी कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदाच्या स्मारकाकडे जाण्यासाठी रांगेत उभा असतांना एक प्रसंग घडला. तमिळ आणि तेलुगु असे दोन ५०-५० जणांचे गट रांगेत पुढे सरकत होते. त्यापैकी एक तेलुगु व्यक्तीचा धक्का तमिळ व्यक्तीला लागला, त्यानंतर त्यांच्यात जे भांडण चालू झाले, ते एकमेकांपासून दूर जाईपर्यंत चालू राहिले. विशेष म्हणजे दोघांनाही एकमेकांची भाषा कळत नव्हती. तरी ‘हे तेलुगु असून आमच्या येथे येऊन दादागिरी करतात’ म्हणून तमिळ लोक भांडत होते, तर ‘तमिळींची दादागिरी खपवून घेणार नाही, आम्ही आणखी माणसे आणून तुम्हाला बघून घेऊ’, असे तेलुगुंचे म्हणणे होते.

८. तमिळनाडूतील जीवघेणी व्यक्तीनिष्ठा

रामनाथपूरम् येथील दुकानांमध्ये देवतांसह स्टॅलिन, करुणानिधी यांची छायाचित्रे अधिक आहेत. तमिळ लोक हे चित्रपट अभिनेते, अभिनेत्री यांना सर्वस्व मानतात. तमिळनाडूत जयललिता, सध्याचे ‘सुपरस्टार’ रजनीकांत यांची मंदिरे आहेत आणि तेथे लोक पूजा करतात. त्यांना देवतांचा दर्जा आहे. त्यांच्यावर अभिषेकही केला जातो. द्रविडभाषिक आग्रहामुळे, अतिरेकामुळे धार्मिक वारसा असलेल्या तमिळींचे असे पतन होत आहे, असे लक्षात आले.

९. बहुभाषिक शहरांचे महत्त्व वाढले !

कर्नाटकातील बेंगळुरू, तेलंगणातील भाग्यनगर (हैद्राबाद) या शहरांमध्ये अनेक भाषा बोलणारे, समजणारे लोक आहेत. तेथे स्थानिक भाषेसह दक्षिणेतील भाषा, हिंदी, इंग्रजीही बोलल्या जातात. परिणामी त्यांचे महत्त्व वाढले आहे. उद्योगधंदे विशेषत: बेंगळुरू आणि भाग्यनगर येथे बस्तान बसवत आहेत, तर पुष्कळ महत्त्व असलेले चेन्नईचे महत्त्व अल्प होत आहे. चेन्नई आणि तमिळनाडूमध्ये उत्तर भारतियांना विशेषत: उत्तरप्रदेश आणि बिहार येथून कामांसाठी आलेल्या कामगारांना अधूनमधून मारहाणीच्या घटना घडतात.

एकूणच काय तर पेरियार यांनी निर्माण करून ठेवलेल्या येथील द्रविड चळवळीमुळे बिचारे काही तमिळ लोक मूळ भारतीय संस्कृतीपासून वेगळे होत चालले आहेत. यात वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे धार्मिक रितीरिवाजांचे पालन, मंदिर संस्कृतीवर श्रद्धा असणारे लोक मात्र आपला वारसा प्रामाणिकपणे चालवत आहेत. विशेषत: संस्कृती जपणारे मंदिरांचे पुजारी, पुरोहित वर्ग यांनी मंदिर संस्कृतीला धरून ठेवल्यामुळे पेरियार यांनी अनेक दशके केलेल्या विखारी प्रचारातही सश्रद्ध तमिळ समाज धर्माला चिकटून आहे.

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.११.२०२३)