शाळेची माहिती अद्ययावत् न केल्यास शिक्षकांचे वेतन रोखण्याचे आदेश !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – ‘यू-डायस प्लस ऑनलाईन प्रणाली’मध्ये शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांची माहिती अद्ययावत् करणार्‍या शाळांमधील शिक्षकांचे वेतन थांबवण्यात यावे, असा आदेश समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ‘यू-डायस प्लस प्रणाली’मध्ये माहिती अद्ययावत् करावी लागणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित शाळांमधील भौतिक सुविधा, शिक्षक संख्या, विद्यार्थी संख्या आदी माहितीच्या आधारे राज्य आणि केंद्र शासनाकडून २०२४-२५, २०२५-२६ या वर्षासाठी वार्षिक नियोजन, अंदाजपत्रक सिद्ध केले जाणार आहे. त्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांनी आवश्यक माहिती अद्ययावत् करण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु बहुतांश शाळांनी त्याकडे दुर्लक्ष केले. माहिती अद्ययावत् न झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थी शासनाकडून देण्यात येणार्‍या विनामूल्य गणवेश, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक सोयी सुविधा, शिष्यवृत्ती आदी गोष्टींपासून वंचित रहाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व माहिती अद्ययावत् करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.