Dublin Riots : शरणार्थी मुसलमानाच्या आक्रमणामुळे डबलिनमध्ये हिंसाचार !

  • युरोपातील वाढत्या शरणार्थीविरोधी वातावरणाचे आयर्लंडमध्ये प्रदर्शन !

  • शरणार्थीने केलेल्या चाकूच्या आक्रमणात ३ लहान मुलांसह एक महिला घायाळ !

लहान मुलांवर आक्रमण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सुरू असलेला हिंसाचार !

डबलिन (आयर्लंड) : येथे २३ नोव्हेंबरच्या दुपारी एका शाळेच्या बाहेर लहान मुलांवर आक्रमण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हिंसाचार झाला. जवळपास २०० लोकांच्या हिंसक जमावाने केलेल्या आक्रमणात १३ दुकानांना आग लावण्यात आली. कट्टर राष्ट्रवादी गटाने केलेल्या या हिंसाचारात पोलिसांची ११ वाहने, ३ बस आणि १ ट्राम यांनाही आग लावण्यात आली. या वेळी एक पोलीस अधिकारीही गंभीर घायाळ झाला. या प्रकरणी ३४ जणांना अटक करण्यात आली आहे.

(सौजन्य : Sky News) 

१. २३ नोव्हेंबरला दुपारी ‘सिटी सेंटर प्रायमरी स्कूल’ या शाळेच्या बाहेर एका शरणार्थी मुसलमानाने ३ मुलांवर चाकूद्वारे आक्रमण केले. या वेळी एक महिला आणि पुरुष हेही घायाळ झाले. यावरून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. ‘डबलिन शहरात सुरक्षा व्यवस्थाच नाही’, असा आरोप करत जमावाने हिंसाचार केला.

हा हिंसाचार राष्ट्रप्रेमातून नव्हे, तर द्वेषातून केला गेला ! – पंतप्रधान लिओ वराडकर

पंतप्रधान लिओ वराडकर

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी या हिंसाचाराचा निषेध करत ‘या हिंसाचारामुळे आयर्लंडची मान लज्जेने खाली गेली आहे’, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, हा हिंसाचार राष्ट्रप्रेमातून नव्हे, तर द्वेषभावनेतून करण्यात आला आहे. हिंसाचार करणार्‍यांचे प्राधान्य मुलांचे रक्षण करण्यापेक्षा दुकाने लुटणे, हे होते.

२. ‘उजव्या विचारसरणीच्या संघटना अपप्रचार करत आहेत आणि अफवा पसरवत आहेत’, असा आरोप पोलिसांनी केला आहे.

३. या हिंसाचाराचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी ‘या दुष्टांकडून (शरणार्थींकडून) आयरिश लोकांवर आक्रमणे केली जात आहेत’, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

लाखो शरणार्थी मुसलमानांमुळे युरोपातील साधनसंपत्तीचा लाभ तेथील स्थानिक जनतेला होतांना दिसत नाही. त्यामुळे तेथील लोक आता याला कंटाळले आहेत. त्यामुळेच नेदरलँड्समध्ये कट्टर शरणार्थीविरोधी व्यक्ती पंतप्रधान होत आहे. हंगेरी, स्वीडन, फिनलँड आणि इटली येथे आधीपासूनच कट्टर राष्ट्रवादी पक्षांची सत्ता असून पुढील क्रमांक आयर्लंडचा लागला, तर आश्‍चर्य वाटू नये !