परराज्यातील अती वेगवान नौकांना बसणार अंकुश !
रत्नागिरी – जिल्ह्याच्या सागरी सीमेत ८ ते १० वाव अंतरामध्ये घुसखोरी करून मासेमारी करणार्या कर्नाटकातील अती वेगवान नौकेवर मत्स्य विभागाने कारवाई केली असून नौकेला पाच पट दंड (अनुमाने १६ लाख १० सहस्र रुपयांचा दंड) करण्यात आला आहे. परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यासाठी स्थानिक मोठ्या मासेमारांच्या वेगवान नौकांचे साह्य घेण्याची तयारीही मत्स्य विभागाकडून करण्यात आली आहे.
१० नोव्हेंबरला रात्री गस्त घालतांना समुद्रात ८ ते १० वाव अंतरामध्ये महाराष्ट्राच्या जलक्षेत्रात कर्नाटकातील सुमारे ३० अती वेगवान नौका मासेमारी करत होत्या. त्या वेगवान नौकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मत्स्य विभागाच्या गस्तीपथकालाच त्या नौकांद्वारे घेराव घातला होता; परंतु याही स्थितीमध्ये गस्तीपथकाला नित्यानंद नामक नौकेला पकडण्यात यश आले होते. ही नौका मिरकरवाडा बंदरात आणून स्थानबद्ध करण्यात आली होती. या नौकेवर २ लाख ६१ सहस्र रुपयांची मासळी होती. या नौकामालकाच्या विरोधात साहाय्यक मत्स्य आयुक्तांकडे सुनावणी घेण्यात आली. या नौका मालकाला १६ लाख १० सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे. हा दंड तात्काळ वसूलही करण्यात आला आहे.