Houthi Ship : हुती बंडखोरांकडून भारतात येणार्‍या मालवाहू जहाजाचे अपहरण !

ही घटना ‘आतंकवादी कृत्य’ असल्याचे संबोधून यामागे इराण असल्याचा इस्रायलचा दावा !

तेल अविव (इस्रायल) – येमेनच्या हुती बंडखोरांनी तुर्कीयेहून भारतात येणार्‍या एका जहाजाचे अपहरण केले आहे. लाल समुद्रात ओलीस ठेवलेल्या या मालवाहू जहाजाचे नाव ‘गॅलेक्सी लीडर’ असून ते ब्रिटनचे जहाज आहे. अपहरणाच्या वेळी जहाजावर २५ लोक होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यासंदर्भात म्हटले की, हे जहाज आमचे नाही. जहाजावर एकही इस्रायली किंवा भारतीय नागरिक नाहीत. हे एक आतंकवादी कृत्य असून यास इराण उत्तरदायी आहे.

१. या घटनेपूर्वी हुती गटाने इस्रायली जहाजांवर आक्रमण करण्याची चेतावणी दिली होती. हुती बंडखोरांचा प्रवक्ता याह्या सारी याने सांगितले की, इस्रायलच्या वतीने जाणार्‍या सर्व जहाजांना लक्ष्य केले जाईल.

२. इस्रायल संरक्षण दलानुसार, बहामास देशाच्या ध्वजाखाली जाणारे हे जहाज ब्रिटीश आस्थापनाच्या नावाने नोंदणीकृत आहे. इस्रायली उद्योगपती अब्राहम उंगार हे त्याचे आंशिक भागधारक आहेत.

३. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या जहाजावर युक्रेन, बल्गेरिया, फिलिपाइन्स आणि मेक्सिको या देशांचे नागरिक आहेत.