इस्लामाबाद (पाकिस्तान) – रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून पाकिस्तान रशियाला सातत्याने धोका देत आहे. एकीकडे रशिया पाकिस्तानला स्वस्त दराने तेल उपलब्ध करून देत आहे, गहू निर्यात करून भुकेकंगाल पाकिस्तान्यांचे साहाय्य करत आहे, तर दुसरीकडे पाक युक्रेनी सैन्याला क्षेपणास्त्रांपासून तोफगोळ्यांपर्यंत पुष्कळ शस्त्रास्त्रे पुरवत आहे. या माध्यमातून पाकिस्तानी सैन्याने नाटो देशांकडून कोट्यवधी डॉलर कमावले आहेत. आता अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला विरोध करण्यासाठीही पाकिस्तान रशियाचे साहाय्य घेऊ पहात आहे. उभय देशांमध्ये जिहादी आतंकवादाच्या विरोधात संयुक्त अभियान चालू आहे.
१. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पाक आणि रशिया यांनी कट्टरतावाद, आतंकवादी विचारसरणीचा प्रसार, तसेच आतंकवाद्यांच्या सूचना आणि तंत्रज्ञान यांचा चुकीचा वापर यांवर १७ नोव्हेंबर या दिवशी व्यापक चर्चा केली. आंतरराष्ट्रीय आतंकवादाशी सामना करण्यासाठी उभय देशांमधील ही १० वी बैठक होती.
२. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून टीटीपी म्हणजेच ‘तेहरीक-ए- तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेच्या पाकमधील कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या. संघटनेकडून पाक सरकारला उलथवून लावण्याची धमकी मिळाल्याने पाक सरकारचे धाबे आधीच दणाणले आहेत. संघटनेकडून करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणांमुळे अनेक पाकिस्तानी नागरिक मारले गेले आहेत. रशियाचे साहाय्य घेऊन पाकिस्तानला आतंकवादी तालिबानवर आक्रमण करायचे आहे. (तालिबानची निर्मिती करण्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याने आणि आज हाच तालिबान पाकच्या मुळावर उठल्याने ‘जे पेरले, तेच उगवले’, ही म्हण सार्थ ठरते ! – संपादक)
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवादाचा निर्माता पाकला रशियाने साहाय्य न करण्यासाठी भारताने पुढाकार घेऊन पाकला एकटे पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! दूरगामी भूराजकीय लाभ मिळवण्यासाठी पाकशी केलेली मैत्री आत्मघातकी आहे, हे भारताने रशियाला पटवून देणे आवश्यक ! |