बिहारमध्ये शाळांना छठपूजेच्या सणाची सुटी रहित !

नितीश कुमार सरकारचा हिंदुद्रोही फतवा !

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या नितीश कुमार सरकारकडून राज्यातील प्रमुख सणांपैकी एक असणार्‍या छठपूजेच्या सणाची शाळांना असणारी सुटी रहित करण्यात आली आहे. यावर भाजपने टीका करतांना ‘इफ्तारवाल्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारने बिहारची संस्कृती नष्ट करण्याचे ठरवले आहे. सनातन धर्माला त्रास देणारे लाखो छठ भक्तांच्या शापाने संपुष्टात येतील’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

१. नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमधील नवनियुक्त शिक्षकांना कामावर उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे. या नवीन आदेशात म्हटले आहे, ‘सर्व शाळा छठपूजेच्या वेळी चालू रहातील.’

नितीश कुमार सरकार ईद आणि नाताळ सणांची सुटी रहित करणार का ?

२. असा निर्णय घेण्यामागे बिहारच्या शिक्षण विभागाने असा युक्तिवाद केला आहे की, नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण होणे बाकी आहे, त्यामुळे त्यांची सुटी रहित  करण्यात आली आहे. नवनियुक्त शिक्षकांचे निवासी प्रशिक्षण २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. छठपूजेच्या निमित्ताने संध्याकाळचा अर्ध्य १९ नोव्हेंबरला, तर २० नोंव्हेंबरला सकाळी अर्ध्य देण्यात येणार आहे.

रक्षाबंधन, नवरात्रोत्सव आणि गुरुनानक जयंती या सुट्याही रहित !

बिहार सरकारने यापूर्वी रक्षाबंधनाच्या वेळीही शाळांची सुटी रहित केली होती. याखेरीज नवरात्रोत्सवातही ३ दिवसांची सुटी अल्प केली होती. २७ नोव्हेंबर असणार्‍या गुरुनानक जयंतीचीही सुटी रहित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • छठपूजेची सुटी रहित करणार्‍या नितीश कुमार सरकारने ईद आणि नाताळ सणांची सुटी रहित करण्याचे धाडस केले असते का ?
  • हिंदु आणि शीख यांच्या सणांच्या सुट्या रहित करणार्‍या बिहार सरकारला वैध मार्गाने जाब कधी विचारणार ?