दीपावलीच्‍या कालावधीत कोल्‍हापूर एस्.टी. विभागाला ७ कोटी ९८ लाख रुपयांचे उत्‍पन्‍न !

कोल्‍हापूर – दीपावली हा सण देशभरात आणि राज्‍यभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या कालावधीत प्रवाशांचा ओघ सर्वाधिक असतो आणि ते मोठ्या प्रमाणात गावाला जातात. त्‍याचाच लाभ उठवत दीपावलीच्‍या काळात योग्‍य नियोजन केल्‍यामुळे कोल्‍हापूरच्‍या एस्.टी. विभागाने ९ ते १६ नोव्‍हेंबर या कालावधीत २१ लाख ५१ सहस्र किलोमीटर प्रवास करत ७ कोटी ९८ लाख ४४ सहस्र ६१७ रुपयांचे उत्‍पन्‍न मिळवले आहे. यात कोल्‍हापूर शहर आगाराने १ कोटी ३४ लाख, तर त्‍या खालोखाल इचलकरंजी विभागाने १ कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न मिळवले आहे.

दीपावलीच्‍या कालावधीत तिकीटदरात १० टक्‍के हंगामी वाढ करण्‍यात आली होती. त्‍याचा लाभही एस्.टी.च्‍या उत्‍पन्‍न वाढीवर झाला. महिलांना ५० टक्‍के सवलत असल्‍याने महिला वर्गाचा प्रवासासाठी सर्वाधिक ओढा दिसून आला. विभागाने ७०० गाड्यांपैकी २५० हून अधिक गाड्या लांब पल्‍ल्‍यांसाठी वापरल्‍या. यामुळे मुंबई, पुणे येथे जाणार्‍या प्रवाशांना सतत अणि जलदगतीने गाड्या उपलब्‍ध होत होत्‍या. कोल्‍हापूर विभागात कोल्‍हापूर-पुणे या मार्गावर सर्वाधिक उत्‍पन्‍न मिळाले आहे. ‘शिवशाही’, ‘इ-शिवाई’, ‘शिवनेरी’ ‘हिरकणी’ या गाड्यांना प्रवाशांकडून सर्वाधिक पसंती दिसून आली.