कार्तिक एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ घंटे दर्शन !

पंढरपूर – कार्तिक एकादशीच्या निमित्ताने अधिकाधिक वारकर्‍यांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता यावे, यासाठी देवाचे राजोपचार बंद करण्यात आले असून २४ घंटे दर्शन व्यवस्था चालू करण्यात आली आहे. कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबरला असून यानिमित्त होणार्‍या यात्रेसाठी येणार्‍या भाविकांना ३० नोव्हेंबरपर्यंत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दिवस-रात्र दर्शन घेता येणार आहे. यात्रा संपल्यावर १ डिसेंबरला श्री विठ्ठलाची प्रत्यक्ष पूजा होणार असून त्या दिवसापासून पुन्हा देवाचे नित्योपचार चालू होणार आहेत.


यात्रा कालावधीत ८ ते १० लाख वारकरी येतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून प्रत्येक घंट्याला अडीच ते तीन सहस्र वारकरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतील, या दृष्टीने प्रशासनाने सिद्धता केली आहे. भाविकांना दर्शन रांगेत बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सिद्धतेचा आढावा घेतला होता. श्री विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, तसेच ६५ एकर परिसर यांची पहाणी केली होती.