|
माले – मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रपती महंमद मोइज्जू यांनी पुनरुच्चार केला आहे की, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय सैनिकांना देश सोडावा लागेल; मात्र मालदीवमध्ये भारतीय सैनिकांच्या जागी चिनी सैनिकांना अनुमती दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोइज्जू यांनी ते चीनच्या जवळ असल्याचे वृत्तही फेटाळून लावले.
राष्ट्रपती महंमद मोइज्जू म्हणाले की, ते भारत, चीन आणि इतर सर्व देश यांच्यासमवेत एकत्र काम करणार आहेत. मालदीवच्या भल्यासाठी सर्वांना समवेत घेऊन मी काम करीन. हिंद महासागर द्वीपसमूहातील प्रतिस्पर्ध्यांविषयी ते म्हणाले की, या स्पर्धेत उतरण्यासाठी मालदीव फार लहान देश आहे. त्यामुळे आमच्या परराष्ट्र धोरणात त्याचा समावेश करण्यात अर्थ नाही. भारतीय सैनिकांच्या माघारीसाठी भारत सरकारसमवेत औपचारिक चर्चा लवकरच चालू होण्याची अपेक्षा आहे, असेही मोइज्जू यांनी सांगितले.
भारत आणि चीन मालदीववर लक्ष ठेवून आहेत; कारण हिंद महासागराच्या मोठ्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी मालदीव महत्त्वाचा आहे. वर्ष २०१८ मध्ये मालदीवची सत्ता हाती घेतलेल्या इब्राहिम सालेह यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारतासमवेतच्या संबंधांना विशेष महत्त्व दिले होते; परंतु नवे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी इब्राहिम सालेह यांच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाला मालदीवसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. मोइज्जू हे चीनधार्जिणे असल्याचे सांगितले जात आहे.