आरोग्‍य सेवेसंदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प खर्चाला संमती !

पिंपरी – अनुमाने ३० लाख नागरिकांच्‍या आरोग्‍य सेवेसंदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प – मोशी येथील ८५० खाटांच्‍या ‘मल्‍टीस्‍पेशालिटी’ रुग्‍णालयाच्‍या खर्चाला महापालिका स्‍थायी समितीने प्रशासकीय संमती दिली. ‘वाढती लोकसंख्‍या आणि यशवंतराव चव्‍हाण स्‍मृती रुग्‍णालयावरील ताण यांचा विचार करून मोशी येथे मल्‍टीस्‍पेशालिटी रुग्‍णालय उभारावे’, अशी मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी राज्‍य सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्‍याकडे केली होती. राज्‍य सरकारच्‍या संमतीनंतर महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून ३४० कोटी ६७ लाख ६३ सहस्र २७३ रुपयांची निविदा स्‍वीकारली असून मे. वॅसकॉन इंजिनीयर्स लिमिटेड या आस्‍थापनाला रुग्‍णालयाचे काम दिले आहे. मोशी येथील गट क्रमांक ६४६ येथील गायरान जागेत हे रुग्‍णालय उभारण्‍यात येणार आहे.