पुणे येथील इंद्रायणी नदी कारखान्‍यातील रसायनयुक्‍त पाणी आणि मैलायुक्‍त सांडपाणी यांमुळे प्रदूषित !

प्रतिकात्मक चित्र

आळंदी (जिल्‍हा पुणे) – येथील इंद्रायणी नदीतील पाण्‍यावर जलप्रदूषणामुळे पुन्‍हा मोठ्या प्रमाणामध्‍ये तवंग आला आहे. नदीकाठच्‍या पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहतीतील, कारखान्‍यातील रसायनयुक्‍त पाणी, गावांमधील मैलायुक्‍त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. मैलायुक्‍त पाण्‍यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे. त्‍यामुळे श्री संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या इंद्रायणी नदीचे पावित्र्य धोक्‍यात आले आहे.

इंद्रायणी नदीमध्‍ये जलपर्णी मोठ्या प्रमाणामध्‍ये वाढलेली आहे. त्‍यातच दैनंदिन वापरातील ६० ते ६५ दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. जिल्‍हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ५७७.१६ कोटी रुपयांचा ‘नदी सुधार प्रकल्‍प’ सिद्ध केला आहे. राज्‍य सरकारने तो प्रस्‍ताव संमत केला असून सध्‍या तो प्रकल्‍प केंद्रशासनाच्‍या अनुमतीच्‍या प्रतीक्षेत आहे.