|
पिंपरी (पुणे) – महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने २ दिवसांमध्ये १२८ मालमत्ता लाखबंद (सील) केल्या आहेत. ही कारवाई ७ जानेवारी या दिवसापर्यंत चालू रहाणार आहे. त्यामुळे लाखबंदची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ३ लाखांहून अधिक कर थकबाकी असणार्या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्ता प्राधान्याने जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२८ डिसेंबर या दिवशी ६५, २९ डिसेंबर या दिवशी ६३ मालमत्ता लाखबंद करण्यात आल्या. या कारवाईमुळे २८ डिसेंबर या दिवशी १३९ मालमत्ताधारकांनी २ कोटी ९१ लाख १३ सहस्र ७७० रुपये, तर २९ डिसेंबर या दिवशी ८९ मालमत्ताधारकांनी १ कोटी ८० लाख २४ सहस्र ९३ रुपये असा एकूण ४ कोटी ७१ लाख ३७ सहस्र ७८३ रुपयांचा कर भरणा केला आहे.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, ‘‘शहरातील जागरूक नागरिकांनी कराचा भरणा करून शहराच्या विकासामध्ये साहाय्य केले आहे. करांमध्ये दिलेल्या विविध सवलतींचा लाभही नागरिकांनी घेतला आहे. आता थकबाकी असणार्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करून लाखबंदीची कटू कारवाई टाळावी.’’