#No Bindi No Business : अनेक दागिने व्यापार्‍यांनी यंदाच्या दिवाळीच्या विज्ञापनांत महिलांना कुंकवासह दाखवले !

हिंदूंच्या दबावामुळे दागिन्यांच्या विज्ञापनात सुधारणा !

मुंबई, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या सणानिमित्त दागिन्यांची विज्ञापने करूनही हिंदु संस्कृतीप्रमाणे महिलांना कुंकू लावलेले न दाखवणार्‍या अनेक दागिने व्यापार्‍यांनी यावर्षी सुधारणा करत दिवाळीनिमित्त केलेल्या दागिन्यांच्या विज्ञापनांत महिलांना कुंकवासह दाखवले आहे. मागील वर्षीपर्यंत बहुतांश दागिने व्यापार्‍यांकडून दागिन्यांच्या विज्ञापनांमध्ये महिलांना विनाकुंकू दाखवण्यात येत होते. यामध्ये तनिष्क, मलबार गोल्ड, पु.ना. गाडगीळ. पी.सी. चंद्रा आदी दागिने व्यापार्‍यांचा समावेश होता.


मागील वर्षीपर्यंत या दागिने व्यापार्‍यांनी हिंदूंच्या सणांनिमित्त विज्ञापन करूनही महिलांच्या कपाळाला कुंकू न दाखवल्यामुळे प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांनी सामाजिक माध्यमांवरून  ‘#NoBindiNoBusiness’ असे आवाहन केले होते, म्हणजेच जी आस्थापने विज्ञापनातील महिलांच्या कपाळावर टिकली/कुंकू दाखवणार नाहीत, त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे. ‘मलबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलर्स’ने वर्ष २०२२ च्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने केलेल्या विज्ञापनातील महिलांच्या कपाळावर कुंकू दाखवले नव्हते. या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेही ‘#NoBindi_NoBusiness’ आणि ‘#Boycott_MalabarGold’ असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर ‘मलबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलर्स’ने हे विज्ञापन मागे घेतले होते. हिंदूंनी वेळीच केलेल्या विरोधामुळे आर्थिक फटका बसल्याच्या भीतीने या वर्षीच्या दिवाळीच्या अनेक विज्ञापनांत महिलांना दागिने, तसेच कपाळावर कुंकू यांच्यासह दाखवण्यात आले आहे.