दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कचरा जाळणार्‍यांच्‍या विरोधात तक्रार करण्‍याचे आवाहन !; २ कामगारांकडून ढाबामालकाची हत्‍या !…

कचरा जाळणार्‍यांच्‍या विरोधात तक्रार करण्‍याचे आवाहन !

मुंबई – महापालिका प्रदूषण नियंत्रणाच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रयत्न करत आहे. कुणी कचरा जाळतांना आढळल्‍यास आता त्‍याची थेट ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. यासाठी ‘मुख्‍यमंत्री स्‍वच्‍छ मुंबई हेल्‍पलाईन क्रमांक ८१६९६-८१६९७’ चालू करण्‍यात आला आहे. यावर तक्रार करावी’, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. संबंधिताचे छायाचित्रही समवेत जोडावे, असेही आवाहन केले आहे.


२ कामगारांकडून ढाबामालकाची हत्‍या !

नागपूर – दिवाळीनिमित्त बोनस (सानुग्रह अनुदान) देण्‍यास नकार दिल्‍याने २ कामगारांनी ढाबामालक राजू ढेंगर यांना मारहाण करून त्‍यांची हत्‍या केली. कामगारांनी गळा आवळून आणि चाकूने भोसकून हत्‍या केली.


बिबट्यामुळे ८ वर्षीय मुलाचा मृत्‍यू !

नाशिक – दिंडोरी तालुक्‍यात बिबट्याच्‍या आक्रमणात ८ वर्षीय मुलाचा मृत्‍यू झाला. मुलगा दिवाळीनिमित्त पणती लावत होता. तेव्‍हाच बिबट्याने त्‍याच्‍यावर झडप टाकली.


वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून तरुणाची आत्‍महत्‍या !

मुंबई – येथील वांद्रे वरळी सागरी सेतूवरून २८ वर्षीय आकाश सिंह या तरुणाने उडी मारून आत्‍महत्‍या केली. तो एका खासगी बँकेत कर्मचारी म्‍हणून काम करत होता. काही मासांपूर्वी त्‍याचा त्‍याच्‍या मैत्रिणीसमवेत प्रेमभंग झाला होता; पण त्‍याच्‍या आत्‍महत्‍येचे नेमके कारण समजू शकले नाही.


 

धुळे येथे तत्‍कालीन पोलीस निरीक्षकांवर विनयभंगाचा गुन्‍हा नोंद !

धुळे – धुळे जिल्‍हा स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेचे तत्‍कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्‍यावर देवपूर पोलीस ठाण्‍यात विनयभंगाचा गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्‍यांचा अश्‍लील व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला होता. या प्रकरणी पीडित महिलेने त्‍यांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट केली होती.

स्‍वतःच्‍या कृत्‍यातून पोलीसदलाची प्रतिमा मलीन करणारे पोलीस !


थेरगाव (पुणे) येथे आधुनिक वैद्यावर गुन्‍हा नोंद !

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – फायनान्‍स आस्‍थापनाकडून कर्ज घेऊन एकाने रुग्‍णालयाचे देयक भरल्‍यानंतर विम्‍याचे पैसेही रुग्‍णालयाकडे जमा झाले. आधुनिक वैद्य किरण थोरात यांच्‍याकडे एकूण १ लाख ४४ सहस्र ४९५ रुपये जमा झाले होते; मात्र ते पैसे त्‍यांनी रुग्‍णाला परत केले नाहीत. हा प्रकार २२ सप्‍टेंबर ते २१ डिसेंबर २०२२ मध्‍ये थेरगावातील ‘केअर लाईफ लाईन’ हॉस्‍पिटलमध्‍ये घडला. या प्रकरणी विनोद जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.