चीनने पाकमधील विविध प्रकल्पांतर्गत गुंतवणूक केला जाणारा अब्जावधी रुपयांचा निधी थांबवला !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीनने पाकिस्तानातील त्याची योजना ‘बेल्ट रोड इनिशिएटिव्ह (बीआर्आय)’ अंतर्गत बांधण्यात येणार्‍या ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या प्रकल्पात गुंतवणूक केल्या जाणार्‍या ६० अब्ज डॉलरचा निधी थांबवला आहे. याखेरीज पाकने या योजनेच्या अंतर्गत वीज, जल व्यवस्थापन, हवामान पालट या प्रकल्पांत पैशांची गुंतवणूक करण्यासही अलीकडेच नकार दिला आहे. खैबर पख्तुनख्वा, आणि पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान या भागांत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणुकीसही चीनने नकार दिला आहे. पाकमधील अंतर्गत परिस्थिती, सुरक्षाव्यवस्था, आर्थिक-राजकीयदृष्ट्या स्थैर्य दिसून आले, तरच नवीन प्रकल्पात गुंतवणूक केली जाईल, असे चीनने सांगून टाकले आहे. चीनच्या या निर्णयामुळे पाकमध्ये टीका चालू झाली आहे.

चीनचा पाकवर विश्‍वास राहिलेला नाही !

पाकिस्तानवर दिवाळखोरीची वेळ आली आहे. आर्थिक संकटामुळे पाकिस्तान चीनच्या प्रकल्पात सहकार्य करत नाही. याखेरीज चीनचे मोठे कर्ज पाकिस्तानवर आहे. त्यामुळेच पाकिस्तान चिनी गुंतवणूकदारांचा पैसा त्यांना परत करेल कि नाही ?, याविषयी चीनला विश्‍वास राहिलेला नाही. पाकने चीनव्यतिरिक्त सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात यांच्याकडून कर्ज घेतले आहे. बलुच लिबरेशन आर्मी याच्यासह अल्-कायदा, इस्लामिक स्टेटनेदेखील चीनच्या प्रकल्पाला लक्ष्य केले आहे. चिनी अभियंते, कर्मचारी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर आक्रमणेही झाली आहेत.

अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य निघून गेल्याने चीनच्या दृष्टीने पाकचे महत्त्व घटले !

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्य तैनात होते, त्या वेळी चीनने पाकला साहाय्य करण्यास प्रारंभ केला होता. त्याने पाकमध्ये गुंतवणूक चालू केली. आता अमेरिकेतील सैन्य अफगाणिस्तानमधून निघून गेल्यानंतर चीनच्या दृष्टीने पाकचे महत्त्व अल्प झाले. त्यामुळेही चीनने पाकपासून दूर रहाणे चालू केले आहे.