हरवलेले पैशांचे पाकीट मिळण्‍याच्‍या संदर्भात साधकाने अनुभवलेले सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्मातून जाणण्‍याचे अफाट सामर्थ्‍य ! 

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
श्री. हर्षद खानविलकर

१. दुचाकीवरून जातांना खिशातून कागदपत्रे आणि पैसे असलेले पाकीट पडणे अन् ते शोधूनही न सापडणे

‘९.९.२०२३ या दिवशी सकाळी ९ वाजता मी फोंडा येथे दुचाकीवरून जात असतांना ‘माझ्‍या विजारीच्‍या (पँटच्‍या) खिशातून पैसे ठेवलेले पाकीट केव्‍हा पडले ?’, हे माझ्‍या लक्षात आले नाही. मी बाजारपेठेत वस्‍तू घेत असतांना ‘खिशामध्‍ये पाकीट नाही’, हे माझ्‍या लक्षात आले. त्‍या पाकिटात माझे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्‍हिंग लायसन्‍स, ए.टी.एम्. कार्ड आणि काही पैसे होते. यामुळे मला थोडासा ताणही आला. मी ज्‍या मार्गाने गेलो होतो, त्‍या मार्गाने मी पुन्‍हा जाऊन बघितले; पण मला पाकीट मिळाले नाही.

२. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी हरवलेले पाकीट मिळण्‍यासाठी नामजप करायला सांगणे, तसेच ‘पाकीट कुठे पडलेले असू शकते’, याविषयी सूक्ष्मातून जाणून त्‍याविषयी सांगणे

मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पाकीट हरवल्‍याविषयी सांगितले. त्‍यांनी मला पाकीट मिळण्‍यासाठी नामजप शोधून दिला. त्‍यांनी मला भ्रमणभाष करून मी शेवटी जेथे थांबलो होतो, त्‍या ठिकाणचे तंतोतंत वर्णन केले. (मी सद़्‍गुरु काकांना त्‍या ठिकाणाविषयी कुठलीही माहिती दिली नव्‍हती किंवा मी कोणत्‍या मार्गाने गेलो होतो, याविषयी सांगितले नव्‍हते.) ते मला म्‍हणाले, ‘‘एका मिठाईच्‍या दुकानासमोर पाकीट पडले आहे आणि ते कुणीतरी उचलून ठेवलेले असणार.’’

३. पाकीट मिळत नसल्‍याने पोलीस तक्रार करण्‍यासाठी पोलीस स्‍थानकात गेल्‍यावर पाकीट सापडले असल्‍याचा निरोप येणे आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आश्‍वस्‍त केल्‍याप्रमाणे पाकीट परत मिळणे

सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्‍यानुसार मी मार्गाने चालत आणि नामजप करत पाकीट शोधण्‍याचा प्रयत्न केला; पण पाकीट मिळाले नाही. याविषयी मी सद़्‍गुरु काकांना सांगितल्‍यावर ते मला म्‍हणाले, ‘‘काळजी करायला नको. पोलीस तक्रार करून ठेवा. कुणीतरी पाकीट आणून देईल. नामजप चालू ठेवा.’’ मी पोलीस स्‍थानकात गेलो. तेथे मी अधिकार्‍यासमोर बसलो असतांना देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातून माझ्‍या बाबांचा (श्री. उदय खानविलकर यांचा) भ्रमणभाष आला. ते म्‍हणाले, ‘‘सनातन संस्‍थेच्‍या ‘हेल्‍पलाइन’वर गोवा येथून भ्रमणभाष करून पाकिटाविषयी कळवले आहे. पाकीट सापडलेल्‍या व्‍यक्‍तीने माहिती दिली आहे.’’ त्‍यानंतर मी पोलीस तक्रार न करता ज्‍या व्‍यक्‍तीला पाकीट मिळाले होते, तिला संपर्क केला आणि तिला भेटून माझे पाकीट घेतले.

४. हरवलेले पाकीट मिळण्‍याच्‍या संदर्भात अनुभवलेली गुरुकृपा !

अ. कलियुगात सज्‍जन व्‍यक्‍ती भेटणे दुर्लभ आहे; मात्र ‘आपल्‍यावर गुरुदेवांची कृपा आणि संतांचा संकल्‍प असेल, तर देव आपल्‍याला योग्‍य व्‍यक्‍तीपर्यंत पोचवतो’, याची मला अनुभूती घेता आली. त्‍या सज्‍जन व्‍यक्‍तीने पाकीट जसे मिळाले, तसे ठेवले होते. माझे हरवलेले पाकीट मला अवघ्‍या साडेतीन घंट्यांत मिळाले.

आ. जेथे पाकीट पडले होते, तेथेे खाद्यपदार्थ आणि मिठाईचे दुकान होते. सद़्‍गुरु काकांनी सांगितल्‍याप्रमाणेच घडले.

इ. पोलीस तक्रार करायला जातांना माझ्‍या मनात विचार होते, ‘या पूर्वीही माझ्‍या वस्‍तू हरवल्‍या; मात्र गुरुदेवांच्‍या कृपेने त्‍या वस्‍तू परत मिळाल्‍या.  अनुमाने १० वर्षापूर्वी मुंबई येथील घरातून माझा २० सहस्र रुपये किमतीचा भ्रमणभाष चोरीला गेला होता. तो मला परत मिळाला. गुरुदेवांनी माझी कधीच हानी होऊ दिली नाही. या वेळीही तसेच काहीतरी होईल.’ अशी  माझ्‍या मनात श्रद्धा आणि सकारात्‍मकता होती.

ई. पाकिटातील कागदपत्रांवर माझा वैयक्‍तिक संपर्क क्रमांक (भ्रमणभाष क्रमांक) कुठेही लिहिला नव्‍हता. पाकिटात प.पू. भक्‍तराज महाराज आणि प.पू. गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) यांची छायाचित्रे आणि दुर्गादेवी, श्रीकृष्‍ण, मारुति यांची चित्रे होती. श्रीकृष्‍णाच्‍या चित्राच्‍या खाली सनातन संस्‍थेचा ‘हेल्‍पलाइन’ क्रमांक होता. या ‘हेल्‍पलाइन’ क्रमांकावर पाकीट मिळालेल्‍या व्‍यक्‍तीने संपर्क केला. ‘वैयक्‍तिक संपर्क क्रमांकापेक्षा देवाचा संपर्क क्रमांक किती महत्त्वाचा आहे !’, याची अनुभूती मला आली.

५. कृतज्ञता

‘सद़्‍गुरु गाडगीळकाकांचा संकल्‍प, त्‍यांची सूक्ष्मातील जाणण्‍याची अफाट क्षमता आणि त्‍यांनी सांगितलेला नामजप अखंड करणे अन् गुरुकृपा’ यांमुळे मला पाकीट मिळाले. ‘मी कितीही निष्‍काळजीपणाने वागलो, तरीही ‘देवाला माझी किती काळजी आहे !’, हे या प्रसंगातून मला अनुभवता आले’, त्‍याबद्दल मी श्री गुरु आणि सद़्‍गुरु गाडगीळकाका यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री हर्षद खानविलकर, गोवा

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.