देवाची ओढ असलेला ५८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून जन्‍माला आलेला मूर्तीजापूर (जिल्‍हा अकोला) येथील कु. वेदांत किरण महामुने (वय ९ वर्षे)!

१२.११.२०२३ (आश्विन कृष्‍ण चतुर्दशी) या दिवशी कु. वेदांत किरण महामुने याचा ९ वा वाढदिवस आहे. त्‍याच्‍या जन्‍मापूर्वी आणि जन्‍मानंतर त्‍यांच्‍या आई-वडिलांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कु. वेदांत महामुने

कु. वेदांत किरण महामुने याला ९ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्‍मापूर्वी

१ अ. एका जैन संतांनी आशीर्वाद दिल्‍यावर गरोदर असल्‍याचे निदान होणे : ‘एकदा शेजारी आलेल्‍या जैन समाजातील एका संतांच्‍या दर्शनाला गेल्‍यावर त्‍यांनी मला सुहास्‍य वदनाने आशीर्वाद दिला. त्‍यानंतर तिसर्‍या दिवशी श्री गजानन महाराजांचा प्रगटदिन असतांना वैद्यकीय तपासणी केल्‍यावर मी गरोदर असल्‍याचे निदान झाले.’

– सौ. स्‍मिता किरण महामुने (कु. वेदांतची आई), (कु. वेदांतची आई), मूर्तीजापूर, जिल्‍हा अकोला.

सौ. स्‍मिता महामुने
श्री. किरण महामुने

१ आ. पत्नी गरोदर असल्‍याचे समजल्‍यावर ‘हे अतिरिक्‍त व्‍ययाचे दायित्‍व कसे सांभाळायचे ?’, याची काळजी वाटणे : ‘पत्नी सौ. स्‍मिता गरोदर आहे’, असे समजल्‍यावर प्रथम मला धक्‍का बसला आणि भीतीही वाटली. आमच्‍या घरची आर्थिक परिस्‍थिती पुष्‍कळ कठीण आहे. ‘एकत्रित कुटुंबात हे अतिरिक्‍त व्‍ययाचे दायित्‍व सांभाळायचे कसे ?’, याची मला पुष्‍कळ काळजी वाटू लागली. पैशांची जमवाजमव करण्‍यासाठी मी स्‍मिताला ३ मासांसाठी माहेरी पाठवले.

१ इ. श्रीकृष्‍ण आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मनातील काळजी अन् भीती यांचे विचार नाहीसे होऊन धैर्य प्राप्‍त होणे : एकदा मी घरी एकटा असतांना मला पुष्‍कळ रडायला आले. सौ. स्‍मिता सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्‍यापासून तिने देवघरात श्रीकृष्‍णाचे मोठे चित्र आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवले आहे. मी काहीच साधना करत नाही; पण त्‍या रात्री मी सतत देवाला आत्‍मनिवेदन करत होतो. प्रथमच माझे लक्ष देवघरातील या दोन्‍ही चित्रांकडे गेल्‍यावर माझे रडणे थांबले. मला एकदम शांत वाटले. भीती आणि काळजी वाटणे बंद होऊन माझे मन स्‍थिर झाले. त्‍या दिवशी मला विलक्षण धैर्य प्राप्‍त झाले. ‘बाळाला जन्‍म देणारा भगवंतच आहे आणि तोच त्‍याचा सांभाळही करील. आपण कर्तव्‍य पार पाडायचे’, असे परम पूज्‍य सांगत आहेत’, असे मला वाटले.

– श्री. किरण महामुने (कु. वेदांतचे वडील), मूर्तीजापूर, जिल्‍हा अकोला.

२. गर्भारपणात जाणवलेली सूत्रे

२ अ. पहिला मास – आधुनिक वैद्यांनी गर्भ वाचण्‍याची शक्‍यता अल्‍प असल्‍याचे सांगणे, औषधोपचार चालू ठेवून गुरुदेवांंना प्रार्थना करणे आणि नंतर गर्भ चांगल्‍या स्‍थितीत असल्‍याचे समजणे : ‘पहिल्‍याच मासापासून मला त्रास होऊ लागला. माझी प्राणशक्‍ती अल्‍प झाली होती. तेव्‍हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘गर्भ वाचण्‍याची शक्‍यता अल्‍प आहे, तरी आपण प्रयत्न करू.’’ मी खचून न जाता औषधोपचार चालू ठेवले आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना प्रार्थना केली, ‘हे गुरुमाऊली, मी सर्व आपणावर सोडले आहे. आपणच येणार्‍या जिवाची काळजी घ्‍या.’’ नंतरच्‍या तपासणीत आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘गर्भ आता चांगल्‍या स्‍थितीत आहे.’’

२ आ. तिसरा मास – सासरच्‍या प्रतिकूल वातावरणामुळे वेगळे रहाण्‍याचा निर्णय घेणे : तीन मास मी आईकडेच होते; परंतु नंतर मला सासरी जावेच लागले. सासरचे वातावरण अनुकूल नव्‍हते. जुनी विचारसरणी, घरात नेहमी वादविवाद आणि घरातील कामाचा ताण, यांमुळे मला पुष्‍कळ काळजी वाटत होती. त्‍या वातावरणात माझा नामजप होणे केवळ अशक्‍य होते. यावर यजमानांनीच तोडगा काढला. आम्‍ही वाड्यातच असलेल्‍या वेगळ्‍या खोलीत रहायचे ठरवले.

२ इ. चौथा मास – नामजप आणि प्रार्थना यांसमवेत श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेचे वाचन करणे : चौथ्‍या मासात माझा कुलदेवी आणि दत्त यांचे नामजप भावपूर्ण होत होते. मी श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेचे वाचन करत होते. समोरच श्रीकृष्‍णाचे मोठे चित्र लावलेले असल्‍यामुळे माझ्‍याकडून सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्‍यक्‍त होत होती. घरातील कामे करतांना माझे नामस्‍मरण चालू असायचे.

२ ई. सहावा मास – गर्भपिशवीचे तोंड उघडे असल्‍यामुळे तिला टाके घालण्‍याचा निर्णय घेणेे : सहावा मास लागल्‍यावर मी वैद्यकीय तपासणीसाठी गेले. तेव्‍हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘गर्भपिशवीचे तोंड उघडे असल्‍यामुळे सतत आराम स्‍थितीतच रहावे लागेल (बेड रेस्‍ट घ्‍यावी लागेल), अन्‍यथा पिशवीला टाके घालावे लागतील.’’ यजमानांनी टाके घालण्‍याचा निर्णय घेतला.

२ उ. सातवा मास

१. सातव्‍या मासात मला क्षात्रगीते ऐकू येत असत.

२. बाळाशी बोलल्‍यावर ते पोटात हालचाल करून प्रतिसाद देत असल्‍याचे जाणवायचे. यजमानांनी ‘श्री’ म्‍हणून हाक मारताच बाळ त्‍यांना प्रतिसाद देत असेे.

३. ‘परम पूज्‍यांचे बाळाकडे लक्ष आहे’, या जाणिवेने माझ्‍याकडून सतत कृतज्ञता व्‍यक्‍त होत असे.

३. बाळाचा जन्‍म

३ अ. गर्भाचे पाणी निघून गेल्‍याने स्‍थिती गंभीर होणे आणि आधुनिक वैद्यांनी शस्‍त्रकर्म केल्‍यावर बाळाचा जन्‍म होणे : ऐन दिवाळीच्‍या मासात मी बाळंतपणाला माहेरी गेले असतांना मी या कुशीवरून त्‍या कुशीवर वळतांना गर्भातील पाणी वेगाने निघून गेले. तेव्‍हा आम्‍ही गोंधळून गेलो. माझा ‘कृष्‍ण’ आणि ‘गुरुमाऊली’, असा धावा चालूच होता. रुग्‍णालयात गेल्‍यावर स्‍थिती गंभीर झाल्‍याचे आधुनिक वैद्यांच्‍या लक्षात आले. त्‍यांनी लगेच शस्‍त्रकर्म करण्‍याचा निर्णय घेतला. शेवटी पहाटे ४.३० वाजता म्‍हणजे नरकचतुर्दशीच्‍या दिवशी बाळाचा जन्‍म झाला.

४. जन्‍मानंतर

अ. बाळ जन्‍मल्‍यावर तेथील प्रमुख आधुनिक वैद्या त्‍याचे निरीक्षण करत होत्‍या. बाळ लगेच रडले नाही. ‘ते काहीतरी चोखत आहे’, असा त्‍याच्‍या तोंडाचा आवाज येत होता. त्‍याचा चेहरा चैतन्‍यदायी वाटत होता. आधुनिक वैद्यांना बाळाला बघून वेगळेच जाणवत होते; पण त्‍या ते शब्‍दांत वर्णन करू शकत नव्‍हत्‍या.

आ. बिकट परिस्‍थितीतून देवाने बाळाला जन्‍माला घातल्‍याने मी कृतज्ञताभावाने सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांच्‍या चरणांवर अश्रूंचा अभिषेक घालत होते.

५. वय ८ ते ९ वर्षे

५ अ. व्‍यवस्‍थितपणा : तो त्‍याचे कपडे, शाळेचे साहित्‍य, खेळणी आणि चपला हे सर्व व्‍यवस्‍थित ठेवतो. घरातील प्रत्‍येक वस्‍तू जागच्‍या जागी ठेवण्‍याचा त्‍याचा प्रयत्न असतो.

५ आ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी ओढ असणे आणि लाठी-काठी, दंडसाखळी यांसारखे खेळ आवडणे : त्‍याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनायला आवडते. तो आम्‍हाला त्‍याची तशी वेशभूषा करायला सांगतो. त्‍याने दांडपट्टा चालवण्‍याची कला अल्‍पावधीत अवगत करून घेतली आहे. त्‍याला लाठी-काठी, दंडसाखळी, तलवारबाजी, असे खेळ खेळायला आवडतात.’

– सौ. स्‍मिता किरण महामुने

५ इ. ‘त्‍याला शूरविरांच्‍या गोष्‍टी ऐकायला आवडते.’ – श्री. किरण महामुने

५ ई. एकपाठी : ‘अभ्‍यास करतांना त्‍याने कोणतेही सूत्र एकदा वाचले की, ते त्‍याच्‍या लक्षात रहाते.

५ उ. आवड-नावड नसणे : मी जो स्‍वयंपाक करते, तो ते आनंदाने जेवतो. एखाद्या पदार्थात काही उणे-अधिक झाले, तरी तो काही बोलत नाही.

५ ऊ. त्‍याला चित्रकलेची आवड आहे. तो केवळ देवतांची चित्रे काढतो आणि रंगवतो. त्‍याला गड आणि किल्ले यांची छायाचित्रे काढायला आवडतात.

५ ए. त्‍याला सात्त्विक कपडे घालायला आणि कपाळावर टिळा लावायला आवडते.

५ ऐ. देवाची आवड

१. तो दीड वर्षाचा असल्‍यापासून देवतांशी सूक्ष्मातून बोलतो. वेदांत जेवतांना पहिला घास देवाला भरवतो. प.पू. भक्‍तराज महाराज यांची काही भजने त्‍याला पाठ आहेत. तो ती गुणगुणतो.’

– सौ. स्‍मिता किरण महामुने

२. ‘तो ठरलेल्‍या वेळी नियमितपणे नामजपाला बसतो. तो अग्‍निहोत्रही करतो.

३. आमच्‍या रहात्‍या घरात मारुतीचे लहान मंदिर आहे. वेदांत दीड वर्षाचा असतांना मंदिरासमोर बसून रिकामे डबे वाजवायचा; म्‍हणून मी त्‍याला टाळ आणून दिले. तो त्‍याच्‍या आजीच्‍या समवेत मंदिरात जाऊन भजन म्‍हणत टाळ वाजवू लागला. तेव्‍हा तिथे उपस्‍थित भाविकांना त्‍याचे कौतुक वाटायचे.

४. तो प्रत्‍येक गुरुवारी होणारा भक्‍तीसत्‍संग लक्षपूर्वक ऐकतो.

५. ‘सनातनचे ४२ वे (समष्‍टी) संत पू. अशोक पात्रीकरकाका घरी येणार’, हे त्‍याला समजल्‍यावर त्‍याची भावजागृती झाली.’

– श्री. किरण महामुने

५ ओ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन घेण्‍याची तळमळ लागणे आणि रामनाथी आश्रमात गेल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍संग लाभल्‍यावर भावजागृती होणे : ‘वेदांतने परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिले नव्‍हते; पण त्‍याला त्‍यांना भेटायची ओढ लागली होती. मी त्‍याला भावजागृतीचा पुढील प्रयोग करायला सांगितला, ‘मी रामनाथी आश्रमात गेलो आहे आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांसमोर बसलो आहे. ते माझ्‍याकडे पाहून स्‍मितहास्‍य करत आहेत.’ त्‍यानंतर हा भावजागृतीचा प्रयोग केल्‍यावर प्रतिदिन त्‍याची भावजागृती होते.

एकदा माझे पती, कु. वेदांत आणि मी रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेथे आम्‍हाला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा सत्‍संग लाभला. त्‍या वेळी तो त्‍यांना म्‍हणाला, ‘‘केवळ एकदा तुम्‍हाला डोळे भरून पहावे’, अशी माझी इच्‍छा होती. ती आज पूर्ण झाली.’’ त्‍यानंतर त्‍याच्‍या डोळ्‍यांतून अश्रूधारा वाहू लागल्‍या. त्‍यामुळे माझीही भावजागृती झाली.

५ औ. रामनाथी आश्रमात गेल्‍यावर जाणवलेली सूत्रे

१. रामनाथी आश्रमात तो घरच्‍यासारखा रमला. तो लहान-मोठ्या सर्व साधकांशी बोलायचा.

२. त्‍या वेळी तेथे सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) होते. वेदांतची त्‍यांच्‍याशी मैत्री झाली होती.

३. एक साधक आम्‍हाला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी वापरलेल्‍या वस्‍तू दाखवत होता. तेव्‍हा वेदांत त्‍या वस्‍तूंचे बारकाईने निरीक्षण करत होता.

४. वेदांतने रामनाथी आश्रमातील काही दगड स्‍वतःजवळ ठेवले.

५. परतीच्‍या प्रवासाला निघतांना वेदांतच्‍या डोळ्‍यांतील अश्रू थांबत नव्‍हते. त्‍या वेळी त्‍याच्‍या कपड्यांवर दैवी कणांचा सडा पडला होता आणि ते चमकत होते.’

– सौ. स्‍मिता किरण महामुने

६. कृतज्ञता : ‘हे विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊली, ‘केवळ आपल्‍या कृपेमुळेच आमच्‍या घराण्‍यात या जिवानेे जन्‍म घेतला. पू. अशोक पात्रीकरकाका घरी येऊन गेल्‍यावरच त्‍यांच्‍या कृपेने वेदांतची गुणवैशिष्‍ट्ये आमच्‍या लक्षात आली’, याबद्दल आम्‍ही उभयतां आपल्‍या आणि पू. पात्रीकरकाका यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो. ‘त्‍याचा सांभाळ कसा करावा ?’, हे आम्‍हाला कळत नाही. आम्‍ही साधनेत न्‍यून पडतो. ‘या दैवी बाळावर योग्‍य प्रकारे संस्‍कार करण्‍यासाठी आपणच आम्‍हाला शक्‍ती द्या’, अशी आपल्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’ – श्री. किरण महामुने आणि सौ. स्‍मिता किरण महामुने

(सर्व सूत्रांचा दिनांक : १९.७.२०२३)

वरील लिखाणाचे टंकलेखन करतांना आलेली अनुभूती : ‘वरील लिखाणाचे संगणकीय टंकलेखन करतांना मला आनंद वाटत होता. त्‍या वेळी वेदांतचा हसरा चेहरा आणि त्‍याची प्रत्‍येक कृती मला माझ्‍या डोळ्‍यांसमोेर दिसत होती. ‘हे सर्व मला गुरुदेवांच्‍या कृपेमुळे अनुभवता आले’, याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता !’

– श्री. श्‍याम राजंदेकर (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ७६ वर्षे), अकोला (१९.७.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.