माहीम गडावरील अतिक्रमण शासनाने हटवले !

  • दैनिक ‘सनातन प्रभात’ने गड-दुर्गांवरील अतिक्रमणाविरोधात उठवला होता आवाज !

  • अनेक वर्षांनंतर गडाचे प्रवेशद्वार उघडले !

  • अतिक्रमण करणार्‍यांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक होते धर्मांध !

  • दुर्गप्रेमी गडावर दीपोत्सव साजरा करणार !

माहीम गडाच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण
अतिक्रमण हटवल्यानंतर मोकळे झालेले गडाचे प्रवेशद्वार

मुंबई, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – अतिक्रमण करून संपूर्ण गड बळकवण्यात आलेल्या माहीम गडावरील अतिक्रमण अखेर राज्यशासनाने हटवले. मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करणार्‍यांनी गडाचे मुख्यद्वार बंद करून प्रवेशद्वारापासूनच गडाच्या आतमध्ये घरे बांधली होती. आता हे अतिक्रमण हटवल्यामुळे अनेक वर्षांनंतर गडाचे मुख्य द्वार उघडण्यात आले असून धनत्रयोदशीच्या (१० नोव्हेंबर) दिवशी दुपारी ४.३० वाजल्यापासून दुर्गप्रेमींकडून गडावर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

अतिक्रमण करणार्‍यांनी या गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी जाळी ठोकून प्रवेशद्वारापासून गडाच्या आतील भागात अतिक्रमण केले होते. गडावर एकूण २६७ अनधिकृत घरे उभारण्यात आली होती. अतिक्रमण करणार्‍यांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक धर्मांध होते. ही सर्व बांधकामे हटवण्यात आली आहेत. या गडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून दुर्गप्रेमी सातत्याने मागणी करत होते. राज्यशासन, पुरातत्व विभाग आणि मुंबई महानगरपालिका यांनी एकत्रितपणे या गडावरील अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही केली आहे.

अतिक्रमण करणार्‍यांना मिळाल्या सरकारकडून सदनिका !

झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या अंतर्गत वर्ष २००९ च्या पूर्वीच्या झोपडपट्टी धारकांना सरकारकडून सदनिका देण्यात येतात. या कायद्याच्या अंतर्गत माहीम गडावर अतिक्रमण करणार्‍या २६७ जणांना मुंबई महानगरपालिकेकडून सदनिका देण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजना, म्हाडा, तसेच अन्य योजनांमधून या सर्वांना सदनिका देण्यात आल्या आहेत.

माहीम गडाचा इतिहास !

माहीम गड हा राज्य पुरातत्व विभागाच्या मालकीचा असून मुंबईतील सर्वांत प्राचीन गड आहे. प्राचीन काळी राजा प्रतापबिंब याने मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. त्या वेळी राजधानी म्हणून त्याने महिकावतीची (आताचे माहीम) निवड केली. श्री महिकावतीदेवीच्या नावावरून या भागाला ‘माहीम’ असे नाव पडले आहे. राजा प्रतापबिंब याच्या काळात, म्हणजे साधारण १४ व्या शतकाच्या कालखंडात माहीमचा गड बांधण्यात आल्याचा इतिहास आहे. हा गड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. अतिक्रमणामुळे या गडाचे ऐतिहासिक स्वरूप नष्ट झाले होते.