Assam Janata Raja : आसाममध्ये ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग होणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे महान हिंदु योद्धे लचित बरफुकन यांचेही चरित्र अशा प्रकारच्या महानाट्याच्या रूपात जगासमोर आणण्याचा मानस !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग आसाम राज्यात करण्यात येणार आहेत. त्या आधारावर पुढे आसामचे महान हिंदु योद्धे लचित बरफुकन यांचेही चरित्र अशा प्रकारच्या महानाट्याच्या रूपात जगासमोर आणण्यात येईल, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.

सरमा पुढे म्हणाले,

१. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांचे आक्रमण परतवून लावले, त्याचप्रमाणे लचित बरफुकन यांनी मोगलांशी लढा दिला. असे असले, तरी लचित यांचा इतिहास आणि पराक्रम यांचा परिचय मात्र आसामपुरताच मर्यादित राहिला. (हीच तर धर्मनिरपेक्ष भारताची शोकांतिका आहे. भारताचा गौरवशाली इतिहास त्याच्या पुढील पिढ्यांपर्यंत येऊ न देण्यासाठी ‘पाश्‍चात्त्यांच्या संस्कृतीला कवटळाणारी’ नेहरूंची आणि ‘संस्कृतला मृत भाषा संबोधणारी’ राजीव गांधींची काँग्रेसच उत्तरदायी आहे, हे जाणा ! – संपादक)

२. बरफुकन यांच्याही चरित्राचा परिचय भारताला व्हावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ नाटकाप्रमाणेच त्यांच्या चरित्रावरही नाट्यप्रयोग केले जावेत, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. या आधारावरच ‘आसाममधील नाटककारांना लचित बरफुकन यांच्या चरित्रावर नाटक सादर करण्याचा अनुभव मिळावा’, यासाठी आसाममध्ये सर्वत्र ‘जाणता राजा’चे प्रयोग करण्यात येणार आहेत.

मुंबईत होणार श्री कामाख्या देवीचे मंदिर !

सरमा म्हणाले की, महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात आसामी नागरिक रहात असल्याने मुंबईत श्री कामाख्या देवीचे मंदिर उभारले जाईल. यासाठी अपेक्षित भूमीचा शोध घेतला जात आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून लवकरच त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. यासह आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा प्रस्तावही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला आहे.