उत्तराखंडमधील ३० मदरशांमध्ये ७४९ मुसलमानेतर विद्यार्थी घेत आहेत शिक्षण !

देहराडून (उत्तराखंड) – राज्यातील ३० मदरशांमध्ये मुसलमानेतर विद्यार्थी इस्लामी शिक्षण घेत असल्याची माहिती उघड झाली आहे. आतापर्यंत अशा ७४९ विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे. यात सर्वाधिक हिंदु मुले आहेत. उधमसिंह नगर, नैनिताल आणि हरिद्वार या जिल्ह्यांमध्ये ही संख्या अधिक आहे.

या प्रकरणी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेला २ नोव्हेंबर या दिवशी नोटीस बजावून ९ नोव्हेंबरपर्यंत यावर उत्तर मागितले होते. त्यानुसार परिषदेने बनवलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, राज्यातील मदरशांमध्ये एकूण ७ सहस्र ३९९ विद्यार्थी शिकतात. यातील ७४९ विद्यार्थी मुसलमानेतर असून ते वेगवेगळ्या ३० मदरशांमध्ये शिक्षण घेत आहेत. हा अहवाल उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेचे संचालक  राजेंद्र सिंह यांनी सादर केला आहे. यात असेही म्हटले आहे की, मदरशांमध्ये एन्.सी.ई.आर्.टी.च्या स्तरावर शिकवले जात आहे. यासाठी पालकांची अनुमतीही घेण्यात आली आहे.

५ मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी

या प्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, यापूर्वीच मदरशांची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. चौकशीनंतर ५ मदरसे बंदही करण्यात आले आहेत. मदरशांत शिकणार्‍या मुसलमानेतर मुलांना अन्य शाळांमध्ये पाठवण्यात येणार आहे, तसेच कोणत्या परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना मदरशांमध्ये प्रवेश घ्यावा लागला ?, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • उत्तराखंडसारख्या देवभूमी राज्यात ही स्थिती असेल, तर देशातील अन्य राज्यांमध्ये काय स्थिती असेल ?, याची कल्पना करता येत नाही !
  • भाजपशासित राज्यात ही स्थिती, तर अन्य हिंदुत्वविरोधी पक्षांच्या राज्यात काय  स्थिती असेल, याची कल्पना करता येत नाही !