मुंबई – ड्रग्ज (अमली पदार्थ) व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असो, त्याला ठेचून काढलेच पाहिजे. जे आमदार आणि खासदार होतील, त्यांच्या कुटुंबात अमली पदार्थांचा परवाना असता कामा नये. ज्यांच्याकडे असा परवाना आहे, त्या काँग्रेसच्या नेत्यांची मी सूची देऊ शकतो, असा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केला. (असा परवाना का दिलाजातो ? – संपादक)
ते पुढे म्हणाले की, भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ६ नोव्हेंबर या दिवशी अनावरण होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह आम्ही पुतळ्याचे अनावरण करणार आहोत. ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या साहाय्याने ४१ आर्.आर्. बटालियन – कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभा केला आहे. सीमेवरील सैन्य प्रतिदिन या पुतळ्याची पूजा करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार किंवा दृक-श्राव्य पद्धतीचा अनोखा पुतळा नव्या संसद भवनात उभारण्याचा मानस आहे.