चांदणी चौक (पुणे) येथील वेद भवन परिसरात सहस्रो नागरिकांचा वाहतूक समस्येविरोधात मूक मोर्चा !

पुणे – पुणे-मुंबई महामार्गावरील वेद भवन (चांदणी चौक जवळील) परिसरातील सोसायट्यांमधील सहस्रो रहिवासी असुरक्षित रस्ते, विस्कळीत आणि धोकादायक वाहतूक अन् वाहतूक कोंडी यांमुळे त्रस्त झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर वेद भवन परिसराच्या विविध रहिवासी इमारतीतील रहिवाशांनी सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी ३ नोव्हेंबर या दिवशी मूक महामोर्चा काढून विविध यंत्रणांचे लक्ष्य वेधून घेतले. वाहतुकीच्या समस्यांमुळे या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर घातक परिणाम होत असून परिसरातील रहिवासी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांच्याच जिवाला धोका निर्माण झाला आहे. ‘यापूर्वी पत्रव्यवहार करूनही संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले’, असे सांगत नागरिकांनी मूक मोर्चा काढला. या मूक महामोर्चामध्ये वेद भवन मंदिर यांसह २४ हून अधिक संकुलातील नागरिक सहस्रोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत.

संपादकीय भूमिका

नागरिकांवर मोर्चा काढण्याची वेळ येणे प्रशासनासाठी लज्जास्पद !