नांदेड येथे ६ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या बांधकाम अधीक्षकासह वरिष्ठ लिपिकाला अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेला बांधकाम विभाग !

नांदेड – येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांना ६ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. १ नोव्हेंबरच्या सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. एका कंत्राटदाराला जिल्ह्यातील केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, आणि गुरफळी या रस्त्यांच्या कामांची निविदा मिळाली होती. तब्बल १४ कोटी १० लाख रुपयांचे हे काम आहे. या कामाची निविदा संमत करण्यासाठी राजपूत यांनी प्रारंभी ७ लाख रुपयांची लाच मागितली. वरिष्ठ लिपिक कंधारे याने शिफारशीसाठी तक्रारदारास ५० सहस्र मागितले होते. तडजोडीनंतर ६ लाख ४० सहस्र रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर ३१ ऑक्टोबर या दिवशी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दिली होती.

या घटनेनंतर त्यादिवशीच्या रात्री ८ वाजता घर आणि कार्यालय येथे विभागाच्या ३ पथकांनी धाड घातली. या कारवाईत पथकाला गजेंद्र यांच्या कार्यालयातील कपाटात ४८ लाख रुपये, तर घरातील गादीखाली २४ लाख ९१ सहस्र ४९० रुपयांची रक्कम सापडली. पैसे मोजण्यासाठी अधिकार्‍यांनी २ यंत्रे मागवली. रक्कम मोजण्यासाठी ३ घंट्यांचा कालावधी लागला.

संपादकीय भूमिका

  • शासनाकडून सर्व सुविधा मुबलक मिळत असूनही बांधकाम विभागातील अधिकार्‍यांची लाच घेण्याची हाव वाढणे, हे भ्रष्टाचार करणार्‍यांना शिक्षा न केल्याचा परिणाम आहे !
  • अशा अधिकारी आणि कर्मचारी यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !