महान सनातन धर्मपरंपरा !

भैरागिनी माँ हनीन

लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. तेथे ख्रिस्त्यांची लोकसंख्या ३२ टक्के आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात पुजारी बनली आहे. आता तिचे नाव ‘भैरागिनी माँ हनीन’ असे झाले आहे. आपल्याकडे उच्च वेतनाच्या चाकरीसाठी भारत देश सोडणारे तरुण असतात. हनीन यांनी अध्यात्म आणि सनातन यांच्याशी जोडण्यासाठी मोठ्या वेतनाची चाकरी सोडली आहे, तसेच मनातील प्रश्‍नांची उत्तरे म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानात सापडल्याने १४ वर्षांपासून त्या भारतात वास्तव्य करत आहेत. यावरूनच अध्यात्म आणि सनातन धर्माची परंपरा असलेल्या भारताचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. आज हनीनसारखे अनेक विदेशी नागरिक भारतातील विविध संस्थांच्या आश्रमांमध्ये राहून साधना करत आहेत. त्यांनी विदेशी जीवनपद्धत सोडली आहे आणि ते भारतीय जीवनपद्धतीनुसार साधना, पेहराव, आहार-विहार आदी करत आहेत. सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया यांच्याशी करणार्‍या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना हीच सणसणीत चपराक आहे !

सद्य:स्थितीत भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी, जिहादी, साम्यवादी, तसेच तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, पुरोगामी आदी शक्ती सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी एकत्र कार्यरत आहेत. पुरोगामी म्हणवणार्‍यांसाठी तर या ख्रिस्ती महिलेचे हे उदाहरण डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. विदेशी उद्योगपती, अभिनेते आदी प्रसिद्ध व्यक्ती मनःशांतीसाठी भारतीय जीवनपद्धतीचे अनुसरण करत आहेत, इतकेच नव्हे, तर भारतात येऊन श्राद्धादी विधीही करत आहेत. अध्यात्म, भारतीय धर्माचरण आदींकडे आकर्षित होऊन हिंदु धर्म स्वीकारत आहेत.

वैदिक ज्ञान, ॐकार, योग, आयुर्वेद, रामायण, महाभारत आदींमुळे जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. आपली संस्कृती सहस्रो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे आणि त्यामुळेच आपलेही अस्तित्व आहे, हे कोरोनासारख्या महामारीच्या काळातही सिद्ध झाले आहे. म्हणूनच हिंदूंनो जागृत व्हा ! साम्यवाद्यांचे सनातन धर्माला नेस्तनाबूत करण्याचे षड्यंत्र जाणा आणि जो कुणी सनातन धर्माकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे आणि बोलण्याचे धैर्य करतो, त्याला सनदशीर मार्गाने ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी सिद्ध व्हा !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे