ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील आबा महाराज श्रीराम मंदिराच्या ‘रामधून’ कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – या मंदिरात पाक्षिक ‘रामधून’ कार्यक्रम आहे; पण आपल्या आत रामनामाची अखंड धूनी प्रज्वलित होणे आवश्यक आहे. प्रभु श्रीरामाचे जीवनचरित्र केवळ वाचण्यासाठी किंवा वर्षातून एकदा आठवण्यासाठी नाही, तर त्याचे गुण आत्मसात करून नित्य आचरण केले पाहिजे, तसेच आपण श्रीरामाला अपेक्षित बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यालाच साधना म्हणतात. सध्या हिंदु देवता आणि सनातन धर्म यांचा उघडपणे अपमान केला जातो. त्याचा सनदशीर मार्गाने निषेध करणे, ही भक्ती आहे. आज रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने धर्मासाठी १ घंटा देण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील आबा महाराज श्रीराम मंदिरमध्ये आयोजित पाक्षिक ‘रामधून’ कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाचा लाभ २०० हून अधिक भाविकांनी घेतला. या मंदिरात गेल्या १८ वर्षांपासून पाक्षिक ‘रामधून’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानाच्या आयोजनासाठी श्री. हेमंत खेडकर यांनी पुढाकार घेतला.
आबा महाराज श्रीराम मंदिराचे महत्त्व
येथील दाल बाजारामध्ये आबा महाराज श्रीराम मंदिर आहे. समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याणस्वामी यांचे बंधू दत्तात्रय स्वामी यांच्या वंशपरंपरेतील एकमेव मंदिर आहे. याचा मूळ मठ महाराष्ट्रातील सातारा येथील शिरगाव येथे आहे. वर्ष १८३८ मध्ये ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज जनकोजी राव यांनी आबा महाराज यांना ग्वाल्हेर येथे येण्याची प्रार्थना केली होती. त्यांनी वर्ष १८३५ मध्ये दाल बाजार येथे श्रीराममंदिर उभारले. दत्ताश्रय स्वामी यांनी ४०० वर्षांपूर्वी लिहिलेली दासबोधाची दुर्लभ पांडुलिपी आजही मंदिरात उपलब्ध आहे. दत्तात्रय स्वामींच्या वंश परंपरेतील श्री. उपेंद्र शिरगावकर आणि श्री. राघवेंद्र शिरगावकर यांनी मंदिराची परंपरा चालू ठेवली आहे.