काँग्रेस राज्यातील घोटाळा !

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ‘महादेव अ‍ॅप’कडून ५०८ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मिळाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील दुर्ग येथील निवडणूक प्रचारसभेत बघेल यांच्यावर टीका करतांना ‘बघेल यांनी महादेवाचे नावही सोडलेले नाही’, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी ‘महादेव अ‍ॅप’ प्रकरणी ईडीने भारतातील चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींना नोटिसा पाठवून आणि धाडी घालून त्यांच्या चौकशा चालू केल्या आहेत. या अ‍ॅपविषयी प्रारंभी असे वाटत होते की, दुबई येथून भारतीय नट-नट्यांच्या साहाय्याने चालवण्यात येणारा खेळ आहे; पण ईडी आणि सामाजिक माध्यमे यांच्या साहाय्याने उपलब्ध होणारी माहिती धक्कादायक अन् सर्वसामान्यांची झोप उडवणारी आहे.

एका राज्याचाच घोटाळ्यात सहभाग

छत्तीसगडसारख्या नक्षलवादाने प्रभावित आणि दुर्गम भाग असलेल्या राज्यातील सौरभ चंद्रकार अन् रवि उप्पल हे दोन छोटे व्यावसायिक मोठा व्यवसाय करण्यासाठी दुबई येथे गेले. त्यांनी तेथील एक शेख अन् पाकिस्तानी यांना भेटून ‘ऑनलाईन गेमिंग पोर्टल’ सिद्ध केले. या पोर्टलवर पोकर, तीन पत्ती हे भ्रमणभाषवरील खेळ, तसेच आय.पी.एल्., क्रिकेट, सॉसर, हॉकी यांसारख्या प्रत्यक्ष खेळांवर अनधिकृत सट्टा लावण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देण्यात आले. प्रारंभी त्यांना लाभ होत नव्हता; मात्र कोरोना महामारीच्या कालावधीत त्यांचे नशीब फळाला आले. त्यांनी अनेकांना विशेषत: छत्तीसगडमधील लोकांना या खेळांचे वेड लावले. छत्तीसगड येथील अनेक गरिबांनी झटपट पैसे मिळवण्यासाठी या खेळांवर पैसे लावले. अगदी प्रारंभीच्या काळात त्यांना थोडे पैसे मिळालेही; मात्र नंतर या खेळांची ‘सेटिंग’ अशी करण्यात आली की, लोकांनी कितीही पैसे लावले, तरी शेवटी ते कंगाल होतील आणि दोन्ही मालक श्रीमंत ! ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून अनुमाने ५ सहस्र कोटी रुपयांची उलाढाल झाली असून ‘राज्यातील जनतेच्या पैशांची एवढी लूट आणि मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असतांना पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना याची कल्पना आली नाही’, असे म्हणता येईल का ? निश्‍चितच कल्पना आली आहे, नव्हे पोलीस, प्रशासकीय अधिकारीच यात सहभागी आहेत ! तेथील साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि मुख्यमंत्री कार्यालयातील व्यक्ती अशांपैकी अनेकांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. या प्रकरणी दुर्गचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांना अटक झाली आहे.

संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन ?

‘अ‍ॅप’च्या या दोघा मालकांपैकी सौरभ यांच्या लग्नात २०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम व्यय झाली. तेव्हापासून अंमलबजावणी संचालनालयाचा या घोटाळ्याच्या अन्वेषणाला खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला. लग्नाच्या निमित्ताने रोखीमध्ये व्यवहार झाला आणि २०० कोटी रुपये छत्तीसगड येथे पाठवल्याचे लक्षात आले. यात आणखी धक्कादायक म्हणजे लॉरेन्स बिश्‍नोई गँगने ‘महादेव अ‍ॅप’च्या प्रमुखाला धमकावल्यावर दाऊदकडून बिश्‍नोई गँगला समज मिळाली आहे म्हणे ! म्हणजे यांची पाळेमुळे देशाबाहेर दाऊदपर्यंत, तर भारतात एका काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत !

पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचारी, घोटाळेबाज अन् चोर यांच्या हातात हात घालून राज्यातील जनतेला कशा प्रकारे लुटू शकते ? याचे ‘महादेव अ‍ॅप’ घोटाळा उत्तम उदाहरण आहे. एक गरीब राज्य आणि तेथील प्रमुखाने राज्यातील जनतेला तिच्या दु:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी तिचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे, तिला आर्थिक आणि सर्वच दृष्ट्या सक्षम करण्यासाठी धडपडणे अपेक्षित असतांना काँग्रेसशासित राज्याची ही दुःस्थिती असते ! यातून ‘काँग्रेस का हात भ्रष्टाचारिओंके साथ’, अशी म्हण का प्रचलित झाली आहे ?’, याची निश्‍चिती पटते. अजून अन्वेषण पूर्ण होणे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोप सिद्ध होणे शेष असले, तरी घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येते. अंमलबजावणी संचालनालयाने घोषित केलेला आकडा कोट्यवधी रुपयांचा असला, तरी एवढी मोठी भ्रष्टाचारी व्यवस्था राज्यात चालू देण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांमध्ये किती कोट्यवधी रुपये वाटले गेले असतील ? हेही लवकर बाहेर येणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात अब्दुल करीम तेलगी या महाठगाने मुद्रांक शुल्क महाघोटाळा करून राज्याला हादरा दिला होता. त्यानेही तत्कालीन काँग्रेस सरकारमधील मुख्यमंत्री आणि मंत्री यांसह अनेकांना कोट्यवधी रुपयांची खिरापत वाटून विकत घेतल्याप्रमाणे स्थिती केली होती. हर्षद मेहताने भारतीय बँकांवर त्याची कुदृष्टी टाकून कोट्यवधी रुपयांचा ‘शेअर बाजार घोटाळा’ करून व्यवस्थेला हादरा दिला होता. असे कोट्यवधी रुपयांचे घोटाळ्यांवर घोटाळे उघडकीस आले आणि आताही येत आहेत. यामध्ये मुख्य समस्या आहे की, घोटाळा उघडकीस येतो, गुन्हेगारांवर खटले चालतात; मात्र शिक्षा कुणाला होत नाही. हर्षद मेहता आणि तेलगी यांचा मृत्यू झाला आहे; पण त्यांनी नावे घेतलेले राजकारणी मात्र मोकाट आहेत, त्यांना कुणालाही शिक्षा झालेली नाही !

भ्रष्टाचार्‍यांच्या यंत्रणेतील प्रत्येकाचे दायित्व निश्‍चित करून कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत हे आरोप निश्‍चित करून शिक्षा दिली गेली पाहिजे, असे जनमत असते. दुबई येथील कोण मोठे धनाढ्य अशांना पाठिंबा देतात ? त्यांना भारतात फरफटत आणण्याची; देशाचा सर्वांत मोठा आतंकवादी दाऊद, ज्याचा प्रत्येक ठिकाणी सहभाग असतो, त्याच्या मुसक्या आवळण्याची धमक शासनकर्त्यांनी बाळगणे आवश्यक आहे, तरच जनतेला लुटणार्‍या या संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन होऊ शकेल !