जानेवारी २०२४ मध्ये चीनची आणखी एक हेरगिरी करणारी नौका श्रीलंकेत येणार !

हेरगिरी करणारी नौका (प्रतिकात्मक छायाचित्र)

कोलंबो (श्रीलंका) – चीनची आणखी एक हेरगिरी करणारी ‘शियांग येंग हाँग-३’ ही नौका श्रीलंकेत जानेवारी २०२४ मध्ये येणार आहे. आतापर्यंत चीनच्या हेरगिरी करणार्‍या ‘शी यान-६’ आणि अन्य एक नौका श्रीलंकेच्या बंदरावर येऊन गेल्या आहेत. दोन्ही वेळा भारताने यावर आक्षेप घेतल्यानंतरही श्रीलंकेने या नौकांना श्रीलंकेच्या बंदरावर येण्याची अनुमती दिली होती. ‘शियांग येंग हाँग-३’ या नौकेला वर्ष २०२१ मध्ये इंडोनेशियाने त्याची गोपनीय माहिती चीनच्या सैन्याला पाठवतांना पकडले होते.

युद्धासाठी पाणबुड्यांच्या मार्गासाठी मानचित्र (नकाशा) निर्माण करण्याचा चीनचा उद्देश !

श्रीलंकेच्या संरक्षणविषयक तज्ञांचे या संदर्भात म्हणणे आहे की, सातत्याने चिनी नौका श्रीलंकेत येण्यामागे २ कारणे आहेत. पहिले म्हणजे सागरी युद्धासाठी स्वतःच्या पाणबुड्यांसाठी सागराच्या तळाचे मानचित्र बनवणे आणि दुसरे म्हणजे समुद्रातील खनिजांचा शोध घेणे. भारतीय सीमेवर हे काम संशोधनाच्या नावाखाली चीनकडून केले जात आहे. त्यामुळे चीनच्या नियोजनानुसार प्रत्येक वर्षी चीनच्या अशा प्रकारच्या २ नौका श्रीलंकेत येत रहातील.

संपादकीय भूमिका

  • भारताचा विरोध असतांनाही श्रीलंका चीनच्या नौकांना अनुमती देतो, यावरून चीनच्या तुलनेत भारताच्या दबावाचा परिणाम श्रीलंकेवर होत नाही, असेच चित्र आहे. ही स्थिती भारतासाठी धोकादायक आहे !