सनातन पंचांगच्या अँड्रॉइड पंचांग २०२४ च्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन
वाराणसी – भारताला ‘हिंदु राष्ट्र’ कसे घोषित करता येईल ?, यावर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या २ दिवसांच्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला ४ नोव्हेंबर या दिवशी प्रारंभ करण्यात आला. याचे उद्घाटन नेपाळच्या विश्व ॐकार एकता अभियानाचे संयोजक व्यासाचार्य किशोर गौतम, अखिल भारतीय विद्वत् परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. कामेश्वर उपाध्याय, भारत सेवाश्रम संघाचे स्वामी ब्रह्ममयानंद, आसामच्या इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे संयुक्त सरचिटणीस स्वामी स्वरूपानंद पुरी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या अधिवेशनात नेपाळसह भारतातील उत्तरप्रदेश, बिहार, देहली, ओडिशा आणि आसाम राज्यातील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होत आहेत.
शंखनाद आणि वेदमंत्र पठण यांनंतर हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले. यानंतर संतांच्या हस्ते सनातन पंचांगच्या अँड्रॉइड पंचांग २०२४ च्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.