उपवासाला अंधश्रद्धा म्हटले
नवी मुंबई, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – नवरात्रीविषयी महापालिकेच्या शाळेत आक्षेपार्ह कार्यक्रम घेतल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली आहे. मुख्याध्यापिकेला खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिली. सकल हिंदु समाजानंतर विश्व हिंदु परिषद, नवी मुंबई शाखेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले. तक्रार मिळून १० दिवस होऊनही पोलीस किंवा महापालिका प्रशासन यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे हिंदू संतप्त आहेत. कमल गिरमकर यांनी प्रथम तक्रार केली होती. तिची नोंद न घेतल्याने विश्व हिंदु परिषदेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली आहे. निवेदन देतांना विश्व हिंदु परिषदेचे बेलापूर प्रखंड मंत्री स्वरूप पाटील, कृष्णा बांदेकर, अधिवक्ता मंगल घरत, प्रा. मारुती मतलापूरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,…
१. नवरात्रीत हिंदु, धर्म संस्कृती यांविरोधात कार्यक्रम महापालिकेच्या तुर्भे गाव शाळेत आयोजित केला होता. याद्वारे धार्मिक भावना भडकवून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा कट होता. यातून धार्मिक तेढ निर्माण होऊन अराजकता माजू शकते. त्याला महापालिका आणि आयोजक, मुख्याध्यापक, वक्ता हे कारणीभूत ठरतील.
२. रमजानमध्ये महिनाभर उपवास करण्याने महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे; मात्र तरीही अंनिस हिंदु धर्माला लक्ष्य करत भक्तांचा अपमान करत आहे. राज्यघटनेने दिलेले धार्मिक पालनाचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांवर घाला घालत आहे. मुख्याध्यापक आणि संबंधितांवर कारवाई करावी. अंनिसच्या वतीने शाळांमध्ये उपक्रम राबवले जात आहेत, ते बंद करावेत. यापुढे कोणतेही उपक्रम राबवण्यास अंनिसला अनुमती देण्यात येऊ नये, अशी माहिती स्वरूप पाटील यांनी दिली.