‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवरील बंदीच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप
सावंतवाडी – न्यायालयाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर बंदी घातली आहे. त्यामुळे पारंपरिक मूर्तीकारांनी मातीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली; मात्र महाराष्ट्रात कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रत्यक्षात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पारंपरिक मूर्तीकारांच्या मूर्ती न विकल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे. यामुळे पारंपरिक मूर्तीकारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. पारंपरिक मूर्तीकारांची हानी टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट करणार असल्याची चेतावणी ‘महाराष्ट्र पारंपरिक मूर्तीकार आणि हस्तकला कारागीर संघा’चे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाठक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री गणेश मूर्तीकारसंघाने माजगाव येथे मूर्तीकारांचा मेळावा आायोजित केला होता. या मेळाव्यात पाठक बोलत होते. या वेळी श्री गणेश मूर्तीकला समितीचे अध्यक्ष वसंत राजे, मूर्तीकार रंजीत मराठे, श्री गणेश मूर्तीकारसंघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण सावंत, गजानन बुरबांदे (नागपूर), श्रीकांत कुंभार (कोल्हापूर), अशोक कडू (मुंबई), नारायण राऊत (पनवेल), राजेंद्र जाधव (रत्नागिरी) आदी उपस्थित होते.
नारायण सावंत यांनी या वेळी ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट करण्यासाठी राज्यस्तरीय अभियान चालू केले पाहिजे’, असे आवाहन केले.
या वेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि मुंबई येथील मूर्तीकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू सावंत, सूत्रसंचालन मनोहर सरमळकर यांनी केले, तर आभार सचिव उदय राऊत यांनी मानले.