सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्ग – सनातन धर्म संपवण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, काँग्रेसचे प्रियांक खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात सरकारने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करायला हवी. सामाजिक कार्याच्या बुरख्याआडून काही संस्था विदेशी निधीच्या साहाय्याने सनातन धर्माच्या विरोधात काम करत आहेत. देशाच्या भावी पिढीचा बुद्धीभेद करून तिच्यात नास्तिकतावाद निर्माण करणे आणि पर्यायाने या पिढीला हिंदु धर्मापासून दूर नेण्याचे प्रयत्न चालू आहेत. सनातन धर्मियांनी हा डाव वेळीच ओळखून तो अयशस्वी करण्यासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले.
सनातन धर्म नष्ट करणार्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या अंतर्गत ‘सनातन धर्म नष्ट करण्याचे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र’ या विषयावर जिल्ह्यात दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड आदी ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाला जिल्हावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी अधिवक्ते, उद्योजक, पत्रकार, धर्मप्रेमी, हितचिंतक, हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी मिळून समाजातील विविध स्तरांवरील मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्री. वर्तक यांनी ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’द्वारे (पी.पी.टी.द्वारे) सोदाहरण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘मी सनातन धर्मरक्षक आहे’, अशी प्रतिज्ञा घेत सनातन धर्माचे रक्षण करण्याचा निश्चय केला.
या वेळी श्री. अभय वर्तक यांनी ‘हिंदुत्वाचे कार्य करतांना साधना आवश्यक आहे. विरोधकांची शक्ती ही त्यांच्या उपासनेमुळे आहे. हिंदूंनी त्यांच्या उपासनेचे बळ वाढवून, देव, देश आणि धर्म रक्षणाच्या कार्यात सहभागी व्हायला हवे’, असे सांगितले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमानंतर ठिकठिकाणी झालेल्या चर्चासत्रांत उपस्थितांनी ‘सनातन धर्माविषयी ‘हेट स्पीच’ करणार्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट करणार’, असे सांगितले.
२. कार्यक्रमाला उपस्थित जिज्ञासूंनी, ‘असे जनजागृतीचे कार्यक्रम वरचेवर आयोजित केले पाहिजेत’, असे सांगितले.
३. कणकवली येथील कार्यक्रमात भाजपचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी श्री. अभय वर्तक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) संदेश पारकर हेही उपस्थित होते.