मळे (तालुका दापोली) येथील मानिनी आणि मंथन आग्रे यांची नासा आणि इस्रोच्या अभ्यास दौर्‍यासाठी निवड

मानिनी आणि मंथन आग्रे या बहीण-भावाची नासा आणि इस्रोच्या अभ्यास दौर्‍यासाठी निवड

दापोली – तालुक्यातील मळे येथील विद्यार्थी मानिनी आणि मंथन आग्रे या बहीण-भावाची नासा आणि इस्रोच्या अभ्यास दौर्‍यासाठी निवड करण्यात आली आहे.

मागील वर्षापासून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे, स्पर्धात्मक वातावरण निर्मिती, संशोधनविषयक जिज्ञासूवृत्ती वाढवणार्‍या विद्यार्थ्यामधून भावी शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी निवडक प्रज्ञावान विद्याथ्यांना नासा आणि इस्रो या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थाना भेट घडवून आणणे, ही योजना राबवण्यात येत आहे. ही योजना केवळ जिल्हा परिषद शाळांच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्र्थ्यांपुरतीच मर्यादित असते.


याकरता विद्यार्थ्यांची केंद्र, तालुका आणि जिल्हा स्तरांवर विविध पातळींवर चाचणी परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या. यामध्ये तालुक्यातील मळे येथील जिल्हा परिषद शाळेतील बहीण-भाऊ मानिनी मंगेश आग्रे आणि मंथन मंगेश आग्रे उत्तीर्ण झाले आहेत.
यामुळे एकाच शाळेतील या दोन्ही विद्यार्थ्यांना इस्रो आणि मानिनी हिला नासा अभ्यास दौर्‍यासाठी जाता येणार आहे. तालुक्यातील मूळ उसगाव येथील रहिवासी असलेली आणि सर्वसाधारण कुटुंबातील ही मुले आई कामानिमित्त मुंबई येथे असल्यामुळे, मळे येथील मामा श्री. विकास पांदे यांच्याकडे शिक्षणासाठी रहातात; तशी मळे शाळा ‘व्हिजन दापोली’ चालू झाल्यापासून प्रत्येक वर्षी शिष्यवृत्ती, नवोदय यासाठी प्रसिद्ध आहेच, या वर्षी मानिनी आणि मंथन यांच्या रूपाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला.
याविषयी मुख्याध्यापक दिनेश चिपटे म्हणाले की, मानिनी आणि मंथन या दोघांनाही नासासाठी जाण्याची संधी मिळाली असती; मात्र जिल्हा परिषदने केलेल्या नियमानुसार इयत्ता सातवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनाच नासा दौरा असल्यामुळे मंथनला केवळ इस्रोपर्यंतच जाता येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात तो सातवीच्या वर्गात असेल, तेव्हा  तो संधी प्राप्त करू शकेल.’’

‘सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो या अभ्यास दौर्‍यासाठी संधी देणारी रत्नागिरी ही एकमेव जिल्हा परिषद आहे ‘, असे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.