S Jaishankar meets families Qatar : भारतीय नौदल अधिकार्‍यांच्या कुटुंबियांची परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली भेट !

भारताच्या निवृत्त नौदल अधिकार्‍यांना कतारने मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे प्रकरण

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – कतारने भारतीय नौदलातील ८ निवृत्त अधिकार्‍यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याने देशभरात खळबळ उडाली असून भारताने यासंदर्भात आक्षेप घेतला आहे. या दृष्टीने परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ३० ऑक्टोबरच्या सकाळी या अधिकार्‍यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भेटीसंदर्भात ‘एक्स’द्वारे पोस्ट करून माहिती देतांना डॉ. जयशंकर म्हणाले की, सरकार या खटल्याच्या संदर्भात गंभीर असून या प्रकरणाला महत्त्व देत आहे. कुटुंबांच्या चिंता आणि वेदना आम्ही समजू शकतो. अधिकार्‍यांच्या सुटकेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत राहील.

काय आहे प्रकरण ?

कतारमध्ये एका खासगी आस्थापनात काम करणार्‍या भारताच्या ८ माजी नौदल अधिकार्‍यांना तेथील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांना ३० ऑगस्ट २०२२ या दिवशी अटक करण्यात आली होती. कॅप्टन नवतेजसिंह गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि खलाशी रागेश अशी यांची नावे आहेत. या ८ जणांनी इस्रायलसाठी हेरगिरी करून कतारची गोपनीय माहिती त्याला पुरवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.