६ युवती, हॉटेलमालक यांसह २१ जणांवर कारवाई !
सातारा, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – सातारा तालुका पोलिसांनी पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर धाड घातली. या वेळी ग्राहक, हॉटेलमालक आणि व्यवस्थापक यांच्यासह २१ जणांना कह्यात घेऊन कारवाई केली आहे. (पोलिसांनी केवळ एका रिसॉर्टवर कारवाई करून न थांबता, अन्य ठिकाणी असे होत नाही ना, हे पहावे. – संपादक)
२८ ऑक्टोबरच्या रात्री विलंबाने ‘पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्ट येथे काही तरुणांनी ६ महिलांना आणले असून त्या संगीताच्या तालावर तोकडे कपडे घालून नाचत आहेत’, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तालुका पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड घातली. तेव्हा हॉटेलमध्ये ६ महिला अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे आढळून आले. उपस्थित ग्राहक या महिलांच्या अंगावर नोटा उडवत होते, तसेच महिलांसमवेत नृत्य करत होते. या वेळी पोलिसांनी १८ व्यक्तींना कह्यात घेतले आणि त्यांच्याकडून ८२ सहस्र ६९८ रुपये रोख आणि भ्रमणभाष शासनाधीन करण्यात आला आहेत.