Bangladesh Mass Protests : बांगलादेशात अराजक : पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात १ लाख लोक रस्त्यावर !

सरन्यायाधिशांच्या घरावरही आक्रमण, एका पोलीस अधिकार्‍याची हत्या !

ढाका (बांगलादेश) – येथे पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी करत १ लाख लोक रस्त्यावर उतरले. या वेळी झालेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकार्‍याची हत्या करण्यात आली, तर १०० हून अधिक लोक घायाळ झाले. दोन सर्वांत मोठे विरोधी राजकीय पक्ष ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ आणि ‘जमात-ए-इस्लामी’ यांच्या कार्यकर्त्यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी हा हिंसाचार केला.

पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात १ लाख लोक रस्त्यावर

१. पुढील वर्षीच्या जानेवारीत बांगलादेशमध्ये राष्ट्रीय निवडणुका होत आहेत. या दृष्टीने पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यागपत्र द्यावे आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी काळजीवाहू सरकार स्थापन करावे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे.

२. स्थानिक दैनिक ‘डेली स्टार’नुसार, गेल्या ४५ मसांतील हे सर्वांत मोठे प्रदर्शन होते.

३. या वेळी देशाचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्या घरावरही आक्रमण करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी आक्रमणकार्‍यांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताच ककरेल चौक, सर्वोच्च न्यायालय परिसर आणि सरन्यायाधिशांच्या निवासस्थानासमोर चकमक उडाली.

४. चकमकींमध्ये किमान १३ वाहने आणि एक पोलीस चौकी जाळण्यात आली अन् १२ हून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली.