अमेरिकेने अणूबाँबची चाचणी टाळण्यासाठी ५०० कोटी डॉलरचा प्रस्ताव दिला होता !  – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा दावा !

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

लाहोर (पाकिस्तान) – अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अणूबाँबची चाचणी न करण्यासाठी त्यांना ५०० कोटी अमेरिकी डॉलर्सची लाच देण्याचा प्रस्ताव दिला होता. असे असतांनाही वर्ष १९९८ मध्ये अणूबाँबची चाचणी करून भारताच्या अणूबाँबच्या चाचणीला चोख प्रत्युत्तर दिले होते, असा दावा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे. ब्रिटनमधून पाकिस्तानमध्ये ४ वर्षांनी परतल्यानंतर ते एका सभेत बोलत होते. या चाचणीविषयी नवाझ शरीफ पूर्वी म्हणाले होते की, जर भारताने अणूबाँबची चाचणी केली नसती, तर आम्हीही केली नसती. भारताच्या अणूबाँबची चाचणीमुळे आम्हाला सार्वजनिक दबावाचा सामना करावा लागला. त्यामुळे आम्ही आमची पहिली अणूबाँबची चाचणीही केली.

१. नवाझ शरीफ पुढे म्हणाले की, मी क्लिंटन यांना सांगितले, ‘माझा जन्म पाकिस्तानच्या भूमीवर झाला आहे आणि मला पाकिस्तानच्या बाजूने नसलेली कोणतीही गोष्ट स्वीकारायची नाही.’ यानंतर शरीफ यांनी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव न घेता लोकांना उपरोधिकपणे विचारले, ‘‘मला सांगा, माझ्या जागी दुसरे कुणी असते, तर त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर असे म्हटले असते का ?’’

२. नवाझ शरीफ यांनी काश्मीर प्रश्‍न सोडवण्याविषयी म्हटले की, आपण आपले गमावलेले स्थान कसे मिळवायचे ? हे आपल्याला ठरवावे लागेल. स्वतंत्र परराष्ट्र धोरण कसे बनवायचे ? आपल्याला आपल्या शेजार्‍यांशी चांगले संबंध निर्माण करायचे आहेत.

संपादकीय भूमिका

  • ब्रिटनमधून पाकमध्ये ४ वर्षांनी परतल्यावर जनतेच्या समोर स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी नवाझ शरीफ अशा प्रकारची विधाने करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !
  • भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटकेची टांगती तलवार असणार्‍या भ्रष्टाचारी नवाझ शरीफ यांची लायकी आणखी काय असू शकते ?