श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दैवी दौर्‍याच्या वेळी साधकाने अनुभवले त्यांचे पंचमहाभूतांवरील नियंत्रण !

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ त्यांचा दैवी दौरा करत असतांना ‘त्या साक्षात् अवतार कशा आहेत ?’, हे त्यांच्या वेगवेगळ्या कृतींतून पंचमहाभूते दाखवत असतात. मानवाला अवताराचे महत्त्व आणि अनुभूती पंचमहाभूतांच्या माध्यमातून कळतात. आपण आपल्या ग्रंथामध्ये वाचले आहे, ‘ज्या वेळी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला, त्या वेळी पृथ्वीवरील सर्व वृक्ष, फुले, वन्य जीव आणि पक्षी हे पुष्कळ आनंदी झाले होते, तसेच भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता, त्या वेळी प्रचंड पाऊस पडून विजा कडाडत होत्या. मनुष्याला जे लक्षात येत नाही, ते ‘पंचमहाभूतांना आधीच लक्षात येऊन ते त्या त्या रूपाने अवताराचे स्वागत करतात.’ असेच काही दैवी प्रसंग श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौरा करत असतांना मला पहायला आणि अनुभवायला मिळाले. ते सर्व तिन्ही गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) कृपेमुळे मला अनुभवायला मिळाले. ते त्यांच्या चरणी अर्पण करतो. रामेश्वरम् आणि मुरुडेश्वर या ठिकाणी दर्शन घेतांना देवाने कशी काळजी घेतली ? त्या अनुभूती या लेखात पाहूया. 

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

१. उन्हाळा असतांना अकस्मात् आकाशात ढग जमणे आणि वातावरण थंड होऊन उन्हाचा त्रास न होणे

१ अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ खिडकीच्या बाजूला बसून भ्रमणभाषवर दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतांना भ्रमणभाषवरील पडदा चमकणे; परंतु ‘सूर्य किती तापला आहे ना !’, असे म्हणून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी पुन्हा वाचन चालू ठेवणे : ‘एप्रिल २०२२ मध्ये आम्ही महर्षींच्या सांगण्यावरून रामेश्वरम् या ठिकाणी दर्शनाला गेलो होतो. त्या ठिकाणी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ खोलीमध्ये खिडकीच्या बाजूला बसून भ्रमणभाषवर दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करत होत्या. काही वेळाने सूर्य वर आला आणि त्याचा प्रकाश श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर पडला. सूर्य जसा वर वर येत होता, तसे प्रकाशाची तीव्रता वाढत होती. त्यामुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा भ्रमणभाषचा पडदा (स्क्रिन) चमकू लागला. त्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘आज सूर्य किती तापला आहे ना ! त्यामुळे बाहेर बसून दैनिक ‘सनातन प्रभात’ही वाचता येत नाही’’, असे बोलून त्या परत दैनिक वाचायला लागल्या.

१ आ. आकाशात पावसाळ्याप्रमाणे ढग जमणे आणि रामेश्वरम् येथील मंदिरात देवदर्शन करून परिसरामध्ये असणार्‍या देवांचे दर्शन घेता येणे अन् उन्हाचा कोणताही त्रास न होणे : त्या वेळी आकाशामध्ये थोडे ढग होते. त्यानंतर हळूहळू आकाशात पावसाळ्याप्रमाणे पुष्कळ ढग जमले. हे आमचे बोलणे झाल्यानंतर सूर्यदेव ५ मिनिटांनी एका ढगाच्या मागे गेले. त्यानंतर पावसाळी वातावरणाप्रमाणे आकाशामध्ये आणखीन ढग जमायला लागले. आम्ही त्या दिवशी रामेश्वरम् येथील मंदिरात देवदर्शन करून परिसरामध्ये असणार्‍या देवांचे दर्शन केले. तो पूर्ण दिवस ऊन पडले नाही आणि वातावरणही थंड होते.

१ इ. कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे पुष्कळ उष्णता असणे आणि तेथे देवदर्शन करण्यास कठीण वाटणे : मे २०२३ च्या शेवटी महर्षींनी सांगितल्यानुसार आम्ही कर्नाटकमधील मुरुडेश्वर येथील शिवलिंगाला अभिषेक करण्यास गेलो होतो. आम्ही त्या ठिकाणी २ – ३ दिवस मुक्कामाला होतो. मे मास आणि समुद्रकिनारा यांमुळे त्या ठिकाणी ‘सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाहेर पडता येत नाही’, अशी उष्णता असते. पहिल्या दिवशी सायंकाळी आम्ही तेथील २ मंदिरांचे दर्शन घेतले. त्या वेळीही उष्णतेचा त्रास होत होता.

१ ई.‘ऊन असले, तरी आपण सर्व देवांचे दर्शन नियोजनाप्रमाणे करूया’, असे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगणे; परंतु ‘एवढ्या उन्हात देवदर्शन कसे घ्यायचे ?’, याची समवेत असलेल्या साधकांना काळजी वाटणे : आम्ही श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना म्हणालो, ‘‘मुरुडेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन दुपारी खोलीवर थांबूया आणि संध्याकाळी दुसर्‍या देवाचे दर्शन घेऊया.’’ तेव्हा त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘मला इथे असणार्‍या बाकीच्याही आत्मजोतिर्लिंगांचे दर्शन घ्यायचे आहे. त्यामुळे ऊन असले, तरी आपण सर्व देवांचे दर्शन नियोजनाप्रमाणे करूया.’’ तेव्हा ‘दुसर्‍या दिवशी एवढ्या उन्हात देवदर्शन कसे करायचे ?’, याची आम्हाला काळजी लागली होती.

१ उ. वातावरणात अकस्मात् ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे उष्णतेचा त्रास न होता ठरल्याप्रमाणे देवदर्शन करता येणे : दुसर्‍या दिवशी आश्चर्य म्हणजे आकाशात ढग जमले आणि पावसाळ्याचे वातावरण असल्याप्रमाणे भासू लागले. आम्हाला उन्हाचा त्रास झाला नाही आणि ठरल्याप्रमाणे सर्व देवदर्शन झाले. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आम्हाला म्हणाल्या, ‘‘आपण करत रहायचे. देव आपोआप सर्व मार्ग मोकळा करतो. देव आपली सर्व काळजी घेतो. आपण श्रद्धा ठेवून करायला हवे.’’ हे त्यांनी आम्हाला त्यांच्या कृतीतून शिकवले.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ समुद्रकिनार्‍यावर एका छोट्या स्टुलावर बसून नामजप करत असतांना त्यांची साडी भिजू नये; म्हणून समुद्राचे पाणी त्यांच्यापासून दूर रहाणे

डिसेंबर २०२२ मध्ये आम्ही महर्षींनी सांगितल्यानुसार गणपतिपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथे गणपतीला अभिषेक करण्यास गेलो होतो. आम्ही गणपतीचे दर्शन घेऊन आणि त्याला अभिषेक करून सायंकाळी तेथील समुद्रकिनार्‍यावर गेलो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ समुद्रकिनार्‍यावर एका लहान स्टुलावर नामजप करत बसल्या होत्या. नामजप झाल्यानंतर त्या समुद्रदेवतेला प्रार्थना करत समुद्राकडे पहात होत्या. त्या वेळी समुद्राचे पाणी त्यांच्या २ – ३ फूट जवळ यायचे आणि परत जायचे. जोपर्यंत त्या बसल्या होत्या, तोपर्यंत असे घडत होते.

२ अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ स्टुलावरून उठून उभ्या राहिल्यावर समुद्राच्या पाण्याने त्यांचा चरणस्पर्श करणे आणि ‘समुद्र नारायणाने त्याच्या स्पर्शाने कुणाला त्रास होणार नाही’, याची काळजी घेणे : आश्चर्य म्हणजे त्या उठून उभ्या राहिल्या आणि एका क्षणात समुद्राच्या पाण्याने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्यानंतर ते पाणी त्यांच्यापासून ५ – ६ फूट मागे गेले. आम्ही सर्व जण हे दैवी दृश्य पहात होतो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ छोट्या स्टुलावर बसल्या होत्या. त्या वेळी त्यांची साडी वाळूला टेकली होती. जर त्या वेळी पाणी त्यांच्याकडे आले असते, तर साडी भिजली असती आणि रेती लागून खराब झाली असती. हे समुद्र नारायणाच्या लक्षात होते आणि त्यामुळे ते पुढे येत नव्हते. साक्षात् समुद्र नारायण महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ उठण्याची वाट पहात होते. ‘त्या कधी उठतात आणि त्यांचे चरणस्पर्श करू ?’, असे ‘त्यांना वाटत असेल’, असे मला वाटले. तसेच ‘आपल्या स्पर्शाने कुणाला काही त्रास होणार नाही’, याचीही काळजी समुद्र नारायणाने घेतली.’                                         (क्रमशः)

– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (३०.६.२०२३)