हिरानंदानी समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन हिरानंदानी यांचा दावा
नवी देहली – तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी अदानी समुहाला लक्ष्य करून मोदी सरकारला अडचणीत आणतील, असे काही प्रश्न काढले होते, जे प्रश्न त्या संसदेत उपस्थित करू शकतील, असे हिरानंदानी समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन हिरानंदानी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मान्य केले आहे. खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘कॅश-फॉर-क्वेरी’ अर्थात् लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतीडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दर्शन हिरानंदानी यांनी लोकसभेच्या आचार समितीकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात दर्शन हिरानंदानी यांनी दावा केला की, महुआ मोईत्रा यांनी त्यांचा संसदेचा लॉगइन पत्ता आणि पासवर्ड त्यांना प्रदान केला आहे. लॉगइन पत्ता आणि पासवर्ड मिळाल्याने हिरानंदानी हे आवश्यकतेनुसार मोईत्रा यांच्या वतीने थेट लोकसभेत प्रश्न उपस्थित करू शकणार होते.
१. दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की, पत्रकार सुचेता दलाल, विख्यात अधिवक्ता शार्दूल श्रॉफ आणि त्यांच्या पत्नी अधिवक्ता पल्लवी श्रॉफ यांनी मोईत्रा यांना साहाय्य केले. याखेरीज काँग्रेसचे नेते शशी थरुर आणि बिजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा यांनीही मोईत्रा यांना या प्रकरणी साहाय्य केले. काही विदेशी पत्रकारांचेही साहाय्य मोईत्रा यांनी घेतले होते. महुआ मोईत्रा यांंनी माझ्याकडून महागडी भेटवस्तूही घेतली. तसेच मी त्यांच्या सरकारी निवासस्थानाची दुरुस्तीही केली. मोईत्रा यांच्या प्रवासाचा आणि सुट्ट्यांचा खर्चही मी केला होता.
२. दर्शन हिरानंदानी यांनी हे मान्य केले की, महुआ मोईत्रा या राजकारणात वेगाने प्रगती करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू इच्छित होत्या. त्यामुळेच त्यांनी अदानी यांना लक्ष्य केले. यासाठी त्या राहुल गांधी यांच्याही संपर्कात होत्या.
३. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना २ पत्रे लिहिल्यानंतर काही दिवसांनी हिरानंदानी यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. निशिकांत दुबे यांनी लिहिलेल्या पत्रात महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मोईत्रा यांनी हिरानंदानी समुहाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला. तर माहिती-तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी संबंधित प्रकरणाची तांत्रिक चौकशी करावी, अशी विनंती केली होती.
महुआ मोईत्रा यांनी हिरानंदानी यांच्या प्रतिज्ञापत्रावर टीका
खासदार महुआ मोईत्रा यांनी ‘हे प्रतिज्ञापत्र हास्यास्पद आहे’, असे म्हटले आहे. संबंधित पत्राचा मसुदा पंतप्रधान कार्यालयाने पाठवला असून त्यावर दर्शन हिरानंदानी यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचे मोईत्रा यांनी म्हटले आहे.
महुआ मोईत्रा यांच्या अधिवक्त्यांची खटल्यातून माघार
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी देहली उच्च न्यायालयात भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि अधिवक्ता जय अनंत देहादराई यांच्या विरोधात मानहानीचा खटला प्रविष्ट केला होता. त्यावर २० ऑक्टोबरला सुनावणी झाली. त्या वेळी अधिवक्ता जय अनंत म्हणाले की, ‘१९ ऑक्टोबरच्या रात्री मला (खासदार महुआ मोईत्रा यांचे अधिवक्ता) शंकरनारायणन् यांनी दूरभाष केला आणि प्रकरण बाहेर सोडवण्यास सांगितले.’ हे ऐकून न्यायमूर्ती दत्ता म्हणाले की, अधिवक्ता शंकरनारायणन् यांनी मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य वाटते. ही अशी गोष्ट आहे ज्याचे उत्तर शंकरनारायन् यांना स्वतःला द्यावे लागेल. हा त्यांचा निर्णय आहे.
यानंतर शंकरनारायणन् या प्रकरणातून बाहेर पडले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे.
मी चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास सिद्ध ! – खासदार महुआ मोईत्रामहुआ मोईत्रा यांनी ट्वीट करून म्हटले की, केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा आचारसंहिता समिती (ज्यात भाजप सदस्यांचे बहुमत आहे) जेव्हा कधी मला बोलावतील, तेव्हा त्यांच्यासमोर चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास सिद्ध आहे. मला अदानी समर्थकांनी चालवलेल्या ‘मीडिया ट्रायल’कडे (वृत्तवाहिन्यांकडून होणारी चर्चा) आणि भाजपच्या ‘ट्रोल’कडे (सामाजिक माध्यमांतून विरोध करणे) लक्ष देण्यास वेळही नाही आणि इच्छाही नाही. |
संपादकीय भूमिकाअशा खासदारांची खासदारकी रहित केली पाहिजे ! |