गोवा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्वरी येथे विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन

विद्या समीक्षा केंद्राचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे आणि इतर मान्यवर

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी येथे एससीईआरटी इमारतीत विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. गुजरातनंतर हे केंद्र उघडणारे गोवा हे दुसरे राज्य ठरले आहे. या वेळी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, आमदार, तसेच इन्फोटेक मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर आदी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘विद्या समीक्षा केंद्राच्या शुभारंभामुळे गोव्याने शिक्षण क्षेत्रात नव्या क्रांतीच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाद्वारे शैक्षणिक क्रांती करण्याची माननीय पंतप्रधानांची दृष्टी आहे. या केंद्रामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे निरीक्षण होईल. शिक्षकांनी काय शिकवले ? विद्यार्थी काय शिकत आहेत ? आदी सर्व गोष्टी नोंद होतील आणि शिक्षकांनी अध्यापनात सुधारणा करणे आवश्यक असल्यास तसे निर्देश शिक्षण खात्याकडून दिले जातील. विद्यार्थी संपूर्ण, शिक्षक समर्थ आणि प्रशासन सशक्त झालेले आम्हाला हवे आहे.

शाळांमधील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ यांच्यावरही हे केंद्र देखरेख ठेवणार आहे. पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंत अंदाजे २ लाख विद्यार्थी राज्यात शिक्षण घेत आहेत. दहावी आणि बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही त्यांचे भवितव्य घडवण्यात शिक्षकांनी साहाय्य करायला हवे.’’

शिक्षण सचिव श्री. प्रसाद लोलयेकर म्हणाले, ‘‘पुढील मासापासून आमचे पथक प्रत्येक तालुक्याला भेट देईल आणि पायाभूत स्तरावरील प्रशिक्षणाचे निरीक्षण करील.’’

नोंदणी न करता पूर्वप्राथमिक शाळा (केजी) चालवता येणार नाही !

यापुढे नोंदणी न करता पूर्वप्राथमिक शाळा (केजी) चालवता येणार नाही. सरकार कडक कारवाई करील, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वप्राथमिक शाळा चालवणार्‍या प्रत्येक संस्थेला नोंदणी करण्यासाठी आम्ही पुरेसा अवधी दिलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून आम्ही पुढे निघालो आहोत.