आध्यात्मिक आणि ऐहिक जीवन पुष्ट करण्यासाठी कार्यप्रवण करणारे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले !

प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

आज संपूर्ण जगतामध्ये माणसाला खरा माणूस, चांगला माणूस बनवण्यासाठी कार्य करणारी ‘भगवद्गीता पाठशाळा’ आणि प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) हे एकमेव असतील. समाजाचे, लोकांचे वैचारिक मंथन करून धर्म, संस्कृती आणि अध्यात्माच्या क्षेत्रात क्रांतीकारी पालट करणार्‍या अन् पंचरंगी क्रांतीचे प्रणेते असलेल्या पू. दादाजींचा जन्मदिवस १९ ऑक्टोबर हा ‘मनुष्य गौरवदिन’ म्हणूनच विश्वातील स्वाध्याय परिवार मोठ्या आनंदाने साजरा करतो. यावर्षीच्या मनुष्य गौरवदिनाचे वैशिष्ट्य, म्हणजे अमेरिकेतील जॉर्जिया प्रांताने सरकारी पातळीवरून १९ ऑक्टोबर हा दिवस ‘मानवी देवत्व दिवस’ (‘ह्यूमन डिगनिटी डे’ ) म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

‘स्वाध्याय कार्या’चे प्रणेते प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे व्यक्तीमत्व म्हणजे वेद, उपनिषदे, दर्शन शास्त्रे, रामायण-महाभारतादी ग्रंथ आणि इतर वैदिक वाङ्मयाचा सखोल अभ्यास केलेले, तसेच पूर्व-पश्चिम येथील ज्ञान-विज्ञान, तत्त्वज्ञान, विविध धर्म, संस्कृती यांचे गाढे अभ्यासक असे होते. त्यांनी हे सर्व ज्ञान स्वतःच्या उपजीविकेचे साधन न करता, भारतातील सर्वसामान्य माणसाला समजेल रुचेल, अशा भाषेत समजावून व्यक्तीला आध्यात्मिक आणि ऐहिक जीवन पुष्ट करण्यासाठी कार्यप्रवण करणारे होते.

‘भक्तीफेरी’ नामक अभिनव संकल्पना

भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे. माणसाची डोके उडवून क्रांती होत नाही, तर माणसाचे विचार पालटून क्रांती करता येते, यासाठी ‘भक्तीफेरी’ नामक अभिनव संकल्पना राबवली. एक स्वस्थ, संघटित, ईश्वरनिष्ठ देशासाठी समर्पित भावनेने काम करणारा समाज निर्मितीचा प्रयत्न प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ‘माधवबाग पाठशाळा, मुंबई’ आणि ‘तत्त्वज्ञान विद्यापीठ, ठाणे’ यांच्या माध्यमातून केला. स्वाध्याय कार्याच्या प्रत्येक प्रवृत्तीमध्ये पू. दादाजींसह आदरणीय निर्मलाताई यांची उपस्थिती सर्व स्वाध्यायींना नेहमीच प्रेरणादायी आणि आश्वासक राहिली.

आदरणीय दीदींच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये भक्तीफेरी न करता, स्वाध्याय परिवारातील सदस्य त्या त्या ठिकाणीच १५ ते १९ ऑक्टोबर अशी ‘भावफेरी’ काढतील. त्यानंतर १९ ऑक्टोबरला संध्याकाळी प्रत्येक शहरांमध्ये त्या त्या केंद्रावरती एकत्र येऊन ‘पांडुरंगाष्टकम्’ या स्तोत्राचे पारायण करतील. तसेच अन्य उपक्रम करून ‘मनुष्य गौरवदिन’ साजरा करणार आहेत.

– रविंद्र चौधरी, आक्कटन, वसई, जिल्हा पालघर.