गाझा शहरातील रुग्णालयावर रॉकेटद्वारे आक्रमण : ५०० जण ठार

हमासकडून इस्रायलवर आरोप, तर इस्रायलकडून हमासचेच रॉकेट पडल्याचा दावा

तेल अविव (इस्रायल) – गाझा शहरातील अल् अहली अरब सिटी रुग्णालयावर रॉकेटद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात ५०० हून लोक ठार झाले आहेत. हे आक्रमण इस्रायलने केल्याचा आरोप हमासने केल्यावर इस्रायलने हा आरोप फेटाळत हे आक्रमण हमासनेच केल्याचा दावा केला आहे. यासाठी इस्रायलने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात पॅलेस्टाईनचे सैनिक रुग्णालयाजवळून आक्रमण करत होत. त्यांचे एक रॉकेटचे लक्ष्य चुकले आणि त्यांच्याच रुग्णालयावर पडले. या आक्रमणामागे ‘इस्लामिक जिहाद’ संघटना आहे, असाही आरोप इस्रायलने केला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले की, ज्यांनी आमच्या मुलांची निर्घृण हत्या केली, ते त्यांच्याच (पॅलेस्टाईनच्या) मुलांचेही मारेकरी आहेत.

जो बायडेन यांनी व्यक्त केला खेद !

रुग्णालयावरील आक्रमणावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना जो बायडेन म्हणाले की,  संघर्षाच्या काळात अमेरिका लोकांच्या जिवाच्या रक्षणासाठी उभी आहे. या आक्रमणात मारले गेलेले आणि घायाळ झालेले रुग्ण, कर्मचारी आणि अनेक निरपराध यांच्याविषयी आम्हाला खेद आहे.

१. तुर्कीए, इराण, रशिया, कॅनडा आदी देशांनीही रुग्णालयावरील आक्रमणाचा निषेध केला आहे. तुर्कीएचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी म्हटले की, गाझाच्या महिला, लहान मुले आणि निरपराध लोक यांवर आक्रमण करणे मानवी मूल्यांच्या विरोधात आहे.

२. इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, निर्वासितांच्या छावण्यांवर जाणीवपूर्वक केलेले हे आक्रमण मूलभूत मानवी मूल्यांचे पूर्ण उल्लंघन आहे.

३. जागतिक आरोग्य संघटनेने याचा निषेध करत म्हटले की, इस्रायलला आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करायला हवे. त्यानुसार रुग्णालयांना लक्ष्य करायला नको होते. इस्रायलच्या सैनिकांनी उत्तर गाझा रिकामी करण्याचा आदेश मागे घ्यावा.

४. संयुक्त अरब अमिरात आणि रशिया यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तात्काळ बैठक बोलावली आहे.

आक्रमणात सहभागी लोकांना उत्तरदायी ठरवले पाहिजे !

पंतप्रधान मोदी यांनी रुग्णालयावरील आक्रमणाविषयी ट्वीट करून म्हटले की, गाझामधील अल् अहली अरब रुग्णालयावरील आक्रमणात झालेल्या जीवितहानीमुळे धक्का बसला आहे. पीडित कुटुंबांच्या प्रती सहानुभूती असून घायाळांनी लवकर बरे व्हावी, अशी प्रार्थना करतो. चालू संघर्षामध्ये नागरिकांच्या जीवितेची हानी होणे गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. यात सहभागी असणार्‍यांना उत्तरदायी ठरवले पाहिजे.

हमासकडून आक्रमण करण्यात आल्याची शक्यता अधिक !

रॉकेटद्वारे आक्रमण करण्यामागे कोण आहे, हे स्पष्ट झालेले नसतांना विविध तर्क सांगितले जात आहेत. आतापर्यंतच्या हमास आणि इस्रायल यांच्या आक्रमणात एकाच रॉकेटमध्ये ५०० जण किंवा त्यापेक्षा अल्प-अधिक जण मारले गेल्याची घटना घडलेली नाही. रॉकेटच्या आक्रमणात ४-५ जण ठार झाल्याच्याच घटना घडल्या आहेत. त्यामुळे जर रुग्णालयावर रॉकेट डागण्यात आले असेल, तर या रुग्णालयात मोठा दारूगोळा किंवा शस्त्रसाठा पूर्वीपासून ठेवण्यात आला असण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेच राष्ट्रपती जो बायडेन इस्रायलमध्ये येणार असतांना काही घंटे आधी ही घटना घडली. त्यामुळे कदाचित् हे आक्रमण हमासनेच जगामध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी केल्याची शक्यता अधिक आहे. तसेच ५०० चा आकडा अधिकृत घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे तोही खोटा असू शकतो.