भाव आणि चैतन्य यांची अनुभूती देणारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे देहली सेवाकेंद्रातील आगमन !

१.४.२०२३ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ देहली सेवाकेंद्रात आल्या होत्या. त्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. कु. मनीषा माहूर

अ. ‘सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाकांनी आम्हा साधकांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ देहली सेवाकेंद्रात येणार आहेत’, असे सांगितल्यावर वारा वेगाने वाहू लागला अन् पाऊसही येऊ लागला.

आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ देहली सेवाकेंद्रात आल्या. तेव्हा वातावरण अगदी स्वच्छ होते, आकाश निरभ्र होते अन् ‘प्रकाश वाढला आहे’, असे मला जाणवलेे.

इ. सकाळी सेवाकेंद्राच्या बाजूच्या परिसरात एक वानर पोळी खात होता. त्या वेळी ‘जणू हनुमानच आला आहे’, असे मला वाटले.

ई. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचेे औक्षण करण्याची संधी मिळाली. त्यांचे औक्षण करतांना माझे हात थरथरत होते. तेव्हा ‘साक्षात् देवीचेच औक्षण करत आहे’, असे मला जाणवलेे.

उ. सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाकांनी आम्हाला रांगोळीने ध्यानमंदिराच्या आतपर्यंत महालक्ष्मीची पावले काढायला सांगितली. त्याप्रमाणे केल्यावर ‘आम्ही एकेक पाऊल ईश्‍वराच्या जवळ जात आहोत’, असे मला जाणवले.

ऊ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे आगमन झाल्यावर त्या दोघी लक्ष्मीच्या पावलांच्या ठशांंवरूनच चालत होत्या. तेव्हा ‘त्यांच्या स्पर्शाने त्या ठशांंमध्ये सजीवता आली आहे’, असे मला वाटले.

ए. दुसर्‍या दिवशीही सर्व साधकांना त्या पावलांच्या ठशांकडे पाहून पुष्कळ चैतन्य जाणवत होते आणि ‘त्यांकडे पहातच रहावे’, असे वाटत होते.

ऐ. ध्यानमंदिरात आल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि सद्गुरु पिंगळेकाका यांचा भाव जागृत झाला. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘माझ्या अंगावर रोमांच आले.’’ त्या वेळी सद्गुरु काका बालकभावात असल्याचे जाणवत होते.

ओ. सद्गुरु काकांनी सर्व सेवा स्वतः भावपूर्ण केल्या आणि आमच्याकडूनही करून घेतल्या. सद्गुरु काकांचा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याप्रतीचा भाव पाहून आम्हा सर्व साधकांची भावजागृती झाली.

औ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘सेवाकेंद्रात आल्यावर ध्यान लागते आणि पुष्कळ शांत वाटतेे. ध्यानमंदिर हाच येथील चैतन्याचा मुख्य स्रोत आहे.’’

अं. पूर्वी मला सर्वांसमोर बोलायला पुष्कळ संकोच वाटत असे. या वेळी गुरुकृपेनेच मी सर्वांसमोर बोलू शकले. या वेळी मला सहजपणे वावरता आले आणि सेवाही करता आली. मी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांची प्रीती जवळून अनुभवू शकले.

क. दुसर्‍या दिवशी जेव्हा मी त्या अमूल्य क्षणांचे स्मरण करत होते, तेव्हा मला गुलाबाचा सुगंध येत होता. तसाच सुगंध इतर २ – ३ साधकांनाही आला.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२. कु. रुची पवार

अ. ‘काही दिवसांपूर्वी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रामरूपाचे स्मरण करत झोपले होते. तेव्हा मला स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टर देहली सेवाकेंद्रात आल्याचे दिसले. त्या वेळी त्यांनी अयोध्यानरेश श्रीरामाची वेशभूषा केली होती. त्यांचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

त्यानंतर ४ दिवसांनी मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे देहलीत आगमन होणार असल्याची आनंदवार्ता मिळाली. त्या वेळी मला वरील स्वप्नाची आठवण झाली.

आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या आगमनाची सर्व सिद्धता सद्गुरु पिंगळेकाकांच्या मार्गदर्शनाखाली चालली होती. त्या वेळी मला वाटत होते, ‘भगवान श्रीकृष्ण स्वतःच दोन देवींच्या स्वागताची सिद्धता करत आहे.’

इ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ दुर्गामातास्वरूपात आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ महालक्ष्मीस्वरूपात बसल्या आहेत. त्या आम्हा सर्व साधकांना चैतन्य, शक्ती अन् ऊर्जा देत आहेत आणि त्यांची दृष्टी माझ्यावर पडल्यामुळेच माझे प्रारब्ध न्यून होत आहे’, असे मला वाटत होते.

ई. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ उभ्या असलेल्या खोलीतून प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. ‘ती खोली देवलोकातील आहे आणि तेथील चैतन्य पुष्कळ वाढले आहे’, असे मला जाणवत होते.

उ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी स्वयंपाकघरात प्रवेश केल्यावर ‘साक्षात् अन्नपूर्णादेवी तेथे आली आहे’, असे मला जाणवले.’

३. सौ. राधिका चव्हाण

अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आणि सद्गुरु चारुदत्त पिंगळेकाका यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याची सेवा करायची आहे’, हे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. ‘माझ्यामध्ये काहीच क्षमता नसतांना आणि भाव नसतांना गुरुदेवांनी मला ही सेवा दिली आहे’, असे वाटून माझ्याकडून ‘गुरुदेवा, ‘आता आपणच माझ्याकडून भावपूर्ण सेवा करून घ्या’, ही प्रार्थना पुनःपुन्हा होत होती.

आ. स्वयंपाक करण्याची सेवा करतांना माझ्या मनात प्रथम नकारात्मक विचार आले आणि ‘थोडी विश्रांती घ्यावी’, असे मला वाटले. त्यानंतर सद्गुरु पिंगळेकाका वास्तूशुद्धी करण्यासाठी स्वयंपाकघरात आले. तेव्हा माझा शारीरिक त्रास ५० टक्के न्यून झाला. त्यामुळे मला पुष्कळ हलके वाटू लागले;

इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ सेवाकेंद्रात आल्यापासून त्यांच्या चैतन्याने माझे सर्व शारीरिक त्रास अन् थकवा दूर झाला. माझे मन आणि शरीर हलके झालेे. त्या वेळी ‘पुष्कळ चैतन्य माझ्याकडे येत आहे’, असे मला जाणवले.

ई. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ओवाळायचे आहे’, हे समजल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी पुष्कळ दिवसांपासूनची इच्छा पूर्ण केली’, असे वाटून माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

उ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ सेवाकेंद्रात आल्यावर साधकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तेव्हा वातावरण पुष्कळ हलके झाले आणि ‘सर्व देवदेवता देहली सेवाकेंद्रात आल्या असून त्याही पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी माझे मन काही क्षण निर्विचार झाले.’

ऊ. जेव्हा मी त्या दोघींना ओवाळले, तेव्हा ‘मला पुष्कळ चैतन्य मिळत आहे. साक्षात् लक्ष्मीदेवी माझ्या समोर आहे आणि मी तिला ओवाळत आहे’, असे मला अनुभवता आले.’

४. श्री. कार्तिक साळुंकेे

अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ देहली सेवाकेंद्रात आल्या असतांना मला त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याची सेवा मिळाली होती. सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वारात त्यांचे आगमन होताच मला आनंद आणि उत्साह जाणवू लागला.

आ. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत असतांना ‘प्रत्यक्ष गुरुदेवांवरच पुष्पवृष्टी करत आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

इ. माझ्या मनात केवळ ‘कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता’, हा जप चालू होता.

ई. ‘देवता आणि सप्तर्षी हे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवले.

उ. ‘सेवाकेंद्रावर दैवी कणांचा वर्षाव होत आहे आणि सेवाकेंद्रात शंखनाद अन् घंटानाद होत आहे’, असे मला जाणवले. हे सर्व अनुभवतांना माझ्या शरिरावर रोमांच आले. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले आणि माझ्याकडून ‘हे देवी, आम्हा सर्वांवर कृपा कर’, अशी प्रार्थना झाली.’

ऊ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ध्यानमंदिराकडे जात असतांना ‘त्यांच्या पावलागणिक सेवाकेंद्रात थंड हवा प्रक्षेपित होत आहे आणि सेवाकेंद्रातील देवत्व जागृत होत आहे’, असे मी अनुभवले. माझ्या संपूर्ण शरिराला शीतल संवेदना जाणवत होत्या आणि मला शांत वाटत होते.’

५. श्री. श्रीराम लुकतुके

अ. ‘३.४.२०२३ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ विमानाने देहलीहून पुढील प्रवासासाठी निघाल्या. त्या दिवशी संध्याकाळी हलकासा पाऊस पडला.

आ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे आकाशमार्गाने भ्रमण झाल्याने आकाशमार्ग शुद्ध अन् पवित्र झाला आहे’, असे मला आतून जाणवत होते.

इ. देहलीमध्ये सामान्यतः प्रदूषणामुळे आकाश स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही; मात्र त्या दिवशी आकाश विलोभनीय, निरभ्र अन् सोनेरी दिसत होते.

ई. त्या वेळी श्रीविष्णूचे स्मरण होऊन माझा ‘नारायण, नारायण’, असा नामजप चालू झाला.

उ. माझी भावजागृती होऊन मला महालक्ष्मीदेवीच्या समवेत श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचे अस्तित्वही अनुभवता आले.’

६. श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)

अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे आगमन होण्यापूर्वी मला उत्साह वाटत होता.

आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ देहली सेवाकेंद्रात आल्यावर माझ्या मनातील विचारांचे प्रमाण अत्यल्प झाले. मला पुष्कळ आनंद जाणवत होता आणि पुष्कळ चैतन्य अनुभवता आले.

इ. माझे मन अंतर्मुख झाले होते. ‘मी साधनेत कुठे न्यून पडतो ?’, हे गुरुकृपेने माझ्या लक्षात येत होते. ‘प्रत्यक्ष अवतारी गुरु आले आहेत’, असे जाणवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : ९.४.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक