भ्रमणभाष वापरण्यावरून रोखल्याने तरुणाने केली त्याच्या आईची हत्या !

कन्नूर (केरळ) येथील भयावह घटना !

आपली जन्मदात्री आई रूग्मणीची हत्या करणारा सुजित !

थिरूवनंथपूरम् (केरळ) : राज्यातील कन्नूर जिल्ह्यात असलेल्या कनिचिरा येथे एका तरुणाला त्याच्या आईने भ्रमणभाष वापरण्यापासून रोखल्याने चिडून त्याने आईची हत्या केली. मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने त्याच्या आईला मारल्याची स्वीकृती दिली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तरुणाला भ्रमणभाषचे व्यसन होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आईने त्याला खडसावले आणि ‘भ्रमणभाष वापरू नकोस’, असे सांगितले. याचा राग आल्याने तरुणाने आईचे डोके भिंतीवर आपटले. आईला रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे तिच्यावर ७ दिवस उपचार चालू होते; परंतु १४ ऑक्टोबर या दिवशी तिचा मृत्यू झाला.

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. त्याला एकदा कोळीकोडमधील कुथिरावट्टम् येथील मानसिक रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यामागे ‘नोमोफोबिया’ नावाचा आजार असल्याचे सांगण्यात येत आहे.


भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे जडलेले ‘नोमोफोबिया’व्यसन काय आहे ?

भारतातील ४ पैकी ३ लोक अल्प-अधिक प्रमाणात ‘नोमोफोबिया’ने ग्रस्त !

(चित्रावर क्लिक करा)

भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे जडलेल्या व्यसनाला ‘नोमोफोबिया’ (नो मोबाईल फोबिया) म्हणजेच मोबाईल नसण्याची भीती, ही संज्ञा वापरली जाते. ही समस्या मानसिक विकार आहे कि नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नसले, तरी भ्रमणभाषच्या व्यसनाने पीडित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. हळूहळू त्याचा परिणाम नातेसंबंधांवरही होऊ लागतो. एका अहवालानुसार भारतातील ४ पैकी ३ लोक अल्प-अधिक प्रमाणात ‘नोमोफोबिया’ने ग्रस्त आहेत. त्यांच्यापैकी काहींनी स्वीकारले की, ‘इंटरनेट बंद होणे’, ‘भ्रमणभाष नादुरुस्त होणे’, ‘बॅटरी संपणे’ इत्यादींमुळे त्यांना भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. (यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आजची तरुण पिढी जिला ‘जेन झी’ नावाने संबोधले जाते, ती अत्यंत चंचल स्वभावाची आणि उथळ विचारांची आहे. या पिढीला धर्मशिक्षण न दिल्याने आणि तिच्याकडून साधना करवून न घेतल्यानेच तिचे अधःपतन होत आहे. ही घटना त्याचे एक टोकाचे उदाहरण आहे, एवढेच !

(वर्ष १९९६ ते वर्ष २०१० या कालावधीत जन्माला आलेल्या पिढीला ‘जेन झी’ म्हणजेच ‘जनरेशन झेड’ म्हटले जाते. पश्‍चिमी देशांत ही संज्ञा अधिक रूढ झाली आहे.)