हमासचा मोठा कमांडर बिलाल अल् कादरा ठार

‘पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद’ संघटनेचे मुख्यालय उद्ध्वस्त

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने १४ ऑक्टोबरच्या रात्री गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणात हमासचा कमांडर बिलाल अल् कादरा ठार झाला. कादरा हा दक्षिण खान युनिस बटालियनमधील नहबा फोर्सचा कमांडर होता. तो इस्रायलमधील अनेक लोकांच्या हत्येला उत्तरदायी होता. त्यानेच दक्षिण इस्रायलच्या किबुत्झ निरीम आणि निरोज भागांतील घरांमध्ये घुसून त्यांची हत्या केली. कादरा ‘हमास’मध्ये काम करण्यासमवेतच ‘पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद’ संघटनेतही महत्त्वाची भूमिका बजावत होता. इस्रायलच्या आक्रमणात ‘पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद’ संघटनेचे सैन्य मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले.

सौजन्य एबीपी लाईव्ह दिल्ली 

इस्रायल संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल सैन्याने गाझा पट्टीतील झेयतून, खान युनिस आणि जाबलिया येथील हमासच्या १०० हून अधिक ठिकाणांवर आक्रमण केले. ज्या ठिकाणांवरून हमास आक्रमण करत होता, त्या ठिकाणांवरही आक्रमणे करण्यात आली. इस्रायलने हमासचे ‘इस्लामिक जिहाद कौन्सिल’चे मुख्यालय, कमांड सेंटर, मिलिटरी कॉम्प्लेक्स, लाँचर पॅड, अँटी-टँक पोस्ट आणि वॉच टॉवर यांवर आक्रमण केले. यासह हमासच्या अनेक पायाभूत सुविधाही उद्ध्वस्त केल्या.