एका राज्यातील एका मंडळाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी फटाक्यांमुळे श्री गणेशमूर्तीवरील वस्त्रांना आग लागल्याची घटना घडली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. श्री गणेशमूर्तीची उंची पुष्कळ मोठी असल्याने वस्त्राला लागलेली आग विझवण्यासाठी काही जण पाणी ओतण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जण मूर्तीच्या अंगाखांद्यांवर चढून मिळेल त्या साहित्याने आग विझवत होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे काही जण तर केवळ बघ्याची भूमिका घेत या सर्व घटनेचे भ्रमणभाषवर चित्रीकरण करत होते. ‘ज्या गणरायाने १० दिवस आपल्याला आनंद आणि चैतन्य दिले, त्या गणेशमूर्तीवर मानवी चुकीमुळे आलेले विघ्न दूर करण्यासाठी काहीतरी खटपट करावी’, असा विचारही मनात न येणे हे किती संतापजनक आहे ! मिरवणुकीत सहभागी झालेल्या अशांना ‘गणेशभक्त’ तरी का म्हणावे ? हा तर कृतघ्नपणाच आहे. श्री गणेशाच्या मूर्तीविसर्जनाच्या वेळी घडलेली ही घटना खरोखरीच दुर्दैवी आणि समाज किती असंवेदनशील झाला आहे, हे दर्शवणारी आहे. हिंदु धर्मातील सर्वच देवतांमध्ये श्री गणेशाला विशेष महत्त्व असते; म्हणूनच त्याला ‘गणराज’ म्हटले जाते. प्रत्येकाच्या मनमंदिरात हा ‘बाप्पा’ नेहमीच विराजमान असतो. असे असतांनाही अशा घटनांमध्ये प्रसंगावधान राखून आगीपासून आपल्या बाप्पाची मूर्ती वाचवण्याचा प्रयत्न केला न जाणे, हे धर्महानी करणारेच आहे.
आजकालच्या उत्सवांचे स्वरूप पहाता अशा पुष्कळ घटना विविध ठिकाणी घडतात. त्यामुळे विनाकारण उत्सवांना गालबोट लागते. सार्वजनिक मंडळांतील श्री गणेशमूर्तीही पुष्कळ मोठ्या आकारातील असतात. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी फटाक्यांमुळे वरीलप्रमाणे आगीच्या घटना घडल्यास त्या टाळण्यासाठी नंतर कितीही प्रयत्न केले, तरी त्यामुळे होणारी हानी भरून न निघणारी आहे. त्यामुळे यासाठी आधीच योग्य ती काळजी घेणे, फटाक्यांचा वापर टाळणे यांसारख्या उपाययोजना काढून आपल्या श्रद्धास्थानांची काळजी घेणे आवश्यक आहे. या घटनेतून योग्य तो बोध घेऊन सर्वच गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांनी योग्य ती काळजी घेतल्यास अघटित घटना टाळता येतील आणि विघ्नहर्त्या गणरायाची कृपा आपणा सर्वांवर होईल. पुढील सर्व उत्सवांच्या वेळी तरी सर्वांकडून वरील प्रकारचे अपप्रकार टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, हीच विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.