वैभववाडी : येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांची पदे भरून रुग्णांची गैरसोय दूर करावी, अन्यथा रुग्णालयाच्या आवारात आमरण उपोषण करू, अशी चेतावणी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदनाद्वारे दिली आहे.
मंगेश लोके यांनी निवेदनात नमूद केले आहे की,
१. वैभववाडी हा दुर्गम तालुका आहे. येथे ग्रामीण रुग्णालय असले, तरी आरोग्य अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे तेथील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे बिघडली आहे. गेले दोन मास तालुक्यात डेंग्यू, मलेरिया आणि विषमज्वर (टायफॉईड) या आजारांचे रुग्ण वाढले आहेत; परंतु रुग्णालयात कर्मचारी आणि डॉक्टर यांची पदे रिक्त असल्यामुळे योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. याविषयी वेळोवेळी प्रशासनाला कळवण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. (दुर्गम भागातील शासकीय रुग्णालयांकडे प्रशासनाचे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक ! – संपादक)
२. रुग्णालयात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे तेथे स्वच्छता होत नाही, त्याचा रुग्णांवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदही गेली काही वर्षे रिक्त आहे. सध्या रुग्णालयात असलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांना वेळेवर पगार दिला जात नसल्यामुळे तेही काम सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. रुग्णालयातील रक्त तपासणीकेंद्र बंद असल्यामुळे रुग्णांना खासगी केंद्रांतून रक्त तपासणी करून घ्यावी लागत आहे. याचा गरिबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील व्यवस्था न सुधारल्यास येत्या १५ दिवसांत शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी लोके यांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकायावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? |