सिक्कीममध्ये अद्यापही २२ सैनिकांसह १०३ लोक बेपत्ता

  • पूरपरिस्थिती कायम !

  • ७ सहस्र लोक अडकले, साहाय्यता कार्य चालू !

गंगटोक (सिक्कीम) – सिक्कीममध्ये ३ ऑक्टोबरला झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २३ जण घायाळ झाले आहेत. अद्यापही २२ सैनिकांसह १०३ जण बेपत्ता आहेत. पुरात अजूनही ७ सहस्र लोक अडकले आहेत. यात लाचेन आणि लाचुंग येथील अनुमाने ३ सहस्र लोकांचा समावेश आहे. पूरस्थिती लक्षात घेता शिक्षण विभागाने १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याची सूचना दिली आहे.

नेपाळमधील भूकंपामुळे हिमालयातील लोनाक सरोवर फुटले असल्याची भीती शास्त्रज्ञांना आहे. मोठा पाऊस झाल्यामुळे सरोवरात तेवढे पाणी धरता येत नव्हते, त्यामुळे त्या पाण्यामुळे तिस्ता नदीला पूर आला. नदीच्या पाण्याची पातळी १५ ते २० फुटांनी वाढली. नदीलगतच्या परिसरात सैन्याची छावणी होती, ती पुरात वाहून गेली आणि तेथे उभी असलेली ४१ वाहनेही बुडाली. राज्य सरकारने तिस्ता खोर्‍याच्या काठावर सापडलेल्या संभाव्य स्फोटके आणि दारूगोळे यांविषयी स्थानिक जनतेला सावध केले आहे. ‘या दारूगोळ्यांपासून दूर रहा. याचे स्फोट होऊ शकतात. अशी उपकरणे दिसल्यास त्वरित कळवा’, असे प्रशासनाने सांगितले आहे.

सिक्कीममधील मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामची या ४ जिल्ह्यांची पुरामुळे सर्वाधिक हानी झाली आहे. २५० हून अधिक घरांची हानी झाली, तर ११ पूल उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकारने या घटनेला आपत्ती घोषित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीममधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याशी चर्चा करून त्यांना साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले.